मुंबई – ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडेची सव्वादोन तास चौकशी केल्यानंतर तिला शनिवारी पुन्हा चौकशीला बोलावले आहे. ड्रग्ज प्रकरणात तपासादरम्यान एनसीबीच्या हाती एका चित्रपट अभिनेत्रीचे आर्यनशी झालेले चॅट हाती लागले आहेत. अनन्यावर होणार्या कारवाईमुळे ती अभिनेत्री अनन्या नाही ना, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, अनन्या कोण आहे, ती काय करते, तिचे आर्यनशी काय संबंध आहेत हे जाणून घेऊयात.
अनन्या ही अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. ती सध्या २२ वर्षांची आहे. स्वतः खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये ती राहते. म्हणजेच ती सध्या वडिलांपासून वेगळी राहते. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार अनन्याकडे ७२ कोटींची मालमत्ता आहे. ती एका चित्रपटाचे जवळपास २ कोटी रुपये घेते. अनन्याची बहुतांश मिळकत जाहिरातींच्या माध्यमातून होते. इन्स्टाग्रामवर तिचे २०.३ लाख फॉलोअर्स आहेत. या फोलोअर्सचा तिला ब्रँड प्रमोशन करण्याचाही फायदा होतो. अनन्याने आतापर्यंत फक्त तीन चित्रपटात काम केले आहे. यामध्ये स्टुडंट ऑफ द इयर २, पती पत्नी और वो २ आणि खाली पिली या चित्रपटांचा समावेश आहे. खाली पिली चित्रपटात तिने इशान खट्टरसोबत काम केले होते. स्टारकिड असल्यामुळे ती अनेकदा ट्रोलही होते.
चॅटमध्ये अनन्या पांडेचे नाव
अनन्या पांडे हिच्या घरावर गुरुवारी छापाही टाकण्यात आला होता. छाप्यादरम्यान एनसीबीने अनन्याचा फोन जप्त केला. आर्यन खान आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅटमध्ये नशा करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. तेव्हा चॅटमधील ती अभिनेत्री अनन्या पांडेच तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच चॅटच्या आधारावर एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह इतर आरोपींची कोठडी मागितली आहे.
सुहानाची खास मैत्रीण
शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिची अनन्या ही जवळची मैत्रीण आहे. तिची आर्यन खानसोबतही मैत्री आहे. तिघेही सोबत पार्टी करताना अनेकदा दिसले आहेत. अनन्यासुद्धा आर्यनसोबत ड्रग्ज घेते असा संशय एनसीबीला त्यांच्या चॅटवरून आला आहे.