विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आज त्यांचा पदभार घेतला आहे. त्यातच एक आहेत रेल्वे व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे अश्विनी वैष्णव. देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या दोन मंत्रालयांची जबाबदारी त्यांना का देण्यात आली, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याबाबत अनेकांना मोठी उत्सुकता आहे. म्हणूनच आपण आता त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत….
अश्विनी वैष्णव हे माजी सनदी अधिकारी आहेत. प्रशासनात त्यांनी चांगली छाप पाडली होती. ते प्रथमच केंद्रीय मंत्री झाले असून त्यांना आता थेट कॅबिनेट दर्जा मिळाला आहे. खरे म्हणजे नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव यांचा समावेश हा अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ओडिशा येथून राज्यसभेची निवडणूक भाजपाच्या तिकिटावर जिंकून सर्वांना चकित केले होते. राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेल्या ५१ वर्षीय वैष्णव हे १९९४ च्या बॅचचे ओडिशा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी १५ वर्षे अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत.
अश्विनी वैष्णव हे सार्वजनिक व खासगी भागीदारी (पीपीपी) चौकटीत केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी परिचित आहेत. आयआयटी पदवीधर असलेल्या वैष्णवने २००८ मध्ये आपली नोकरी सोडली आणि ते अमेरिकेत वार्डन विद्यापीठात गेले, तेथून त्यांनी एमबीए केले. अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर ते देशात परत आले आणि गुजरातमध्ये त्यांनी स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उघडले. त्यानंतर त्यांनी जनरल इलेक्ट्रिक आणि सीमेन्स यासारख्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले.
आता वैष्णव यांची मंत्रिमंडळातील प्रवेश झाल्याने भारतीय रेल्वेची कमाई वाढविण्याच्या मार्गांचा विचार केला जात आहे. तसेच रेल्वेच्या विकासासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलचा मार्ग खुला करण्याचा विचारही केला जात आहे. भारतीय रेल्वेची अनेक टप्प्यांत खासगी गाड्या सुरू करण्याची योजना असून यात पहिल्या टप्प्यात वर्ष २०२३-२४ मध्ये अशा प्रकारे डझनभर गाड्या चालवल्या जातील, त्यानंतर २०२७ पर्यंत त्यांची संख्या वाढवून १५१ होईल.
राज्यसभा निवडणुकीच्या सहा दिवस आधी वैष्णव भाजपमध्ये दाखल झाले होते. त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी बालेश्वर आणि कटक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली. १९९९ मध्ये झालेल्या चक्रीवादळा दरम्यान त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून आपले कौशल्य दाखविले आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. वैष्णव यांनी २००३ पर्यंत ओडिशामध्ये काम केले आणि त्यानंतर ते तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उपसचिव झाले. त्यानंतर वैष्णव यांना वाजपेयी यांचे सचिव बनविण्यात आले होते.