संपूर्ण जगात एकच प्रश्न सगळ्यांना छळतो आहे तो म्हणते सुरक्षित मेसेजिंग अॅप कोणते. व्हॉट्सॲप, टेलिग्राम की सिग्नल? या तिन्ही अॅपवर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख….
व्हॉट्सॲपने त्यांची नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यापासून एकच गदारोळ उडाला आहे. आता व्हॉट्सॲप वापरायचे की टेलिग्राम कडे वळायचे की सिग्नल वापरायचे या गोंधळात सगळे लोक पडले आहेत.. व्हॉट्सॲपच्या नवीन धोरणानुसार आठ फेब्रुवारीनंतर तुमच्या फोनमधला महत्वाचा डाटा फेसबुकला शेअर करण्यात येणार आहे. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आयपी ऍड्रेस, तुमच्या फोनची बॅटरीची स्थिती, तुमच्या व्हॉट्सॲप पेमेंटवर हणारे सगळे व्यवहार याची माहिती फेसबुकला दिली जाईल.
व्हॉट्सॲपची अनेक बिझनेस अकाउंट आहेत. या बिझनेस अकाउंटला तुम्ही जो डाटा शेअर कराल किंवा जे मेसेज शेअर कराल तेसुद्धा फेसबुकला शेअर केले जातील. यामुळे आपलं सगळंच उघड होईल अशी भीती लोकांना वाटते आणि त्यामुळे लोक मोठ्या संख्येने व्हाट्सअप सोडून इतर दोन साधनांकडे वळायला लागले. इथे हा फरक लक्षात घेतला पाहिजे की व्हॉट्सऍप तुमच्या माझ्यासारख्या खाजगी लोकांचे मेसेजेस फेसबुककडे पाठवणार नाही. त्याचे end-to-end encryption असल्यामुळे ते मेसेज मध्ये कोणालाही वाचणे शक्य नाही. त्यामुळे फक्त मेसेजचा विचार करायचा तर आपले मेसेज सुरक्षित आहेत, त्याबद्दल घाबरून जाण्याचे कारण नाही. फक्त बिझनेस अकाउंटला तुम्ही पाठवलेले मेसेज किंवा तिथे तुम्ही करत असलेले आर्थिक व्यवहार हे व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या रडारवर येतील आणि त्याची नोंद फेसबुककडे राहील.
टेलिग्राम
हा आणखी एक पर्याय लोकांना उपलब्ध आहे. इथले मेसेजेस end-to-end encrypt नाहीत हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. टेलिग्रामवर तुम्ही जर सिक्रेट चॅट असा पर्याय निवडलात तरच ते मेसेजेस end-to-end encrypt होतात. अन्यथा ते होत नाहीत. प्रत्येक वेळेस तुम्हाला हा पर्याय निवडावा लागतो, हे त्रासदायक आहे. त्यामुळे टेलिग्रामकडे जाताना सावधानता बाळगली पाहिजे .अर्थात व्हॉट्सॲपपेक्षा टेलिग्राममध्ये जास्त सोयी आहेत. व्हॉट्सॲपमध्ये एका वेळेला अठरा MB ची फाईल पाठवता येते, तर टेलिग्राममध्ये दीड जीबीपर्यंत म्हणजे १५०० MB पर्यंत फाईल पाठवता येते. लोकं या टेलिग्राममधून सिनेमाच्या सिनेमा पाठवतात ही त्याची क्षमता आहे. इथेही व्हॉट्सॲपसारखे ग्रुप तयार करता येतात. पण वेगळेपण असे की व्हॉट्सॲपला असलेली २५६ सदस्यांची मर्यादा इथे नसते. इथे अक्षरशः एक किंवा दोन लाख किंवा त्याहूनही अधिक लोकांचा ग्रुप तुम्ही तयार करू शकता. टेलिग्रामचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला तुमचे स्वतःचे चॅनेल उघडता येते. त्या चॅनेलचा पत्ता लोकांना दिला की लाखो लोक ते फॉलो करू शकतात. म्हणजेच तुमचा एक मेसेज लाखो लोकांपर्यंत जाऊ शकतो. व्हॉट्सॲपमध्ये ते होत नाही. टेलिग्राममध्ये अनेक वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स आणि वेबसाईट्स यांची चॅनेल्स उपलब्ध आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्यांच्या बातम्या अगदी फुकट वाचू शकता हा एक मोठा फायदा तिथे आहे. काही चॅनलमध्ये अनेक वृत्तपत्रांच्या PDF फाइल्स उपलब्ध आहेत, परंतु ते किती कायदेशीर आहे याची मला कल्पना नाही.
सिग्नल हे तुलनेने नवीन आहे, परंतु व्हॉट्सॲपसारखेच त्यात end-to-end encryption दिलेले आहे, end-to-end encryption म्हणजे तुम्ही एखाद्याला मेसेज पाठवला तर तो तुम्हाला दोघांनाच वाचता येईल किंवा तुम्ही एखाद्या ग्रुपला मेसेज केलात तर तुम्ही आणि त्या ग्रुपचे अन्य सदस्य यांनाच फक्त तो मेसेज वाचता येईल, अशी सोय सिग्नल मध्ये आहे. मध्ये कोणालाही हॅक करून मेसेज वाचता येणार नाहीत. सिग्नल हे एका ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थेचे उत्पादन आहे. त्यामुळे तिथे अजून तरी जाहिराती दिसत नाहीत आणि त्यांच्याकडे व्हॉट्सॲपच्या तुलनेत खूपच कमी ग्राहक असल्याने अजून त्यांनी ‘व्यापारीकरणा’चा विचारही केलेला नाही. परंतु आणखी काही वर्षांनी काय होईल हे सांगता येणार नाही. परंतु सध्या तरी सिग्नल हे स्वतंत्र असून खूपच चांगले आहे आणि पूर्ण सुरक्षितता आहे असे सांगण्यात येते आहे. काही वर्षांनी फेसबुकने ते विकत घेतले तर काय होईल याची कल्पना आताच येऊ शकते.
सिग्नल
व्हॉट्सॲपकडून तुम्ही सिग्नलला जा असा काही नामवंतांचा सल्ला आहे. त्यात फोन पे आणि पेटीएम यांच्यातील बड्या लोकांचाही समावेश आहे. हे दोघेही व्हॉट्सऍप पेमेंटचे थेट स्पर्धक आहेत, त्यामुळे आपल्या स्पर्धकांना नामोहरम करण्याचा एक नामी मार्ग या दोघांना सुचला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. दुसरे असे की फेसबुकने २०१४मध्ये व्हॉट्सॲप विकत घेतले. २०१६पासून त्यांनी फेसबुकला वापरकर्त्यांचा डेटा शेअर करणे सुरु केले. त्यामुळे आताच्या निर्णयात नवीन एवढेच की आर्थिक व्यवहार , बिझनेस अकाउंटवरील संभाषण हे सगळे फेसबुककडे जाणार आहे. फोन अथवा पीसीचा आयपी ऍड्रेस हाही जाणार आहे. त्यामुळेच वापरकर्ते घाबरून दुसरीकडे जात आहेत. आपल्या फोनवरून फोन पे अथवा गूगल पे वापरून केलेले आर्थिक व्यवहारही फेसबुक कडे जाणार का अशी भीती काही जणांना वाटते. कारण फोन / पीसी याचा आयपी ऍड्रेस फेसबुककडे आधीच गेलेला असेल. यावर व्हॉट्सॲपने खुलासा करणे गरजेचे आहे. काल अशीही बातमी आली की व्हॉट्सॲप ग्रुप invite च्या लिंक गूगल सर्च मध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सॲपने तातडीची दुरुस्ती करून हे रोखले, पण या बातमीमुळे व्हॉट्सॲपच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटलेच.
व्हाट्सअॅप असो वा कोणतेही समाजमाध्यम, आपण त्यावर काय लिहायचे आणि काय नाही याचे भान ठेवलेच पाहिजे. तुम्ही तुमची खाजगी माहिती, पॅन नंबर, आधार कार्ड, बँकेचे तपशील किंवा अन्य काही अतिशय गोपनीय माहिती देत असाल आणि ती उद्या व्हाट्सअप फेसबुक किंवा अन्य कोणत्याही कंपनीच्या हातात लागली तर त्यांना दोष देऊ नका. आपण शक्यतो अशी गोपनीय माहिती समाजमाध्यमातून देऊ नये. पण हे भान बऱ्याच लोकांना राहत नाही आणि त्यामुळे गोपनीय माहिती सहज दिली जाते. हे जास्त धोक्याचे आहे.
आपण फोनवर वेगवेगळे अँप डाऊनलोड करताना सगळ्याच्या सगळ्या परवानग्या देऊन टाकतो. तेव्हा कोणताही विचार करत नाही. एखाद्या अँपला तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्टची किंवा कॅमेऱ्याची किंवा मायक्रोफोनची परवानगी कशासाठी द्यायची, याचा आपण जराही विचार करत नाही. तो करायला हवा. प्रत्येकाने आपापल्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन आपण कोणत्या अँपला गरज नसणाऱ्या परवानग्या दिल्या आहेत ते पडताळून पाहायला हवे. परंतु काही अँप अशी असतात की सगळ्या परवानग्या मिळाल्याशिवाय ती डाऊनलोड होत नाहीत. अशी ॲप डाऊनलोड करणे टाळता येते का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
गेल्या चार-पाच दिवसात व्हाट्सअपचे बरेच वापरकर्ते टेलिग्राम किंवा सिग्नलकडे वळलेले आहेत. परंतु व्हाट्सअपच्या वापरकर्त्यांची संख्या एवढी प्रचंड आहे की सध्या तरी त्यांच्यावर काही मोठा विपरीत परिणाम होईल असे दिसत नाही.
थोडक्यात, आपण समाजमाध्यमांना दोष देताना या माध्यमांवर काय शेअर करतो हेही ध्यानात घेतले पाहिजे. व्हाट्सअपच्या प्रायव्हसी धोरणांमुले एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे हा सारा शेवटी पैशाचा मामाला आहे प्रत्येक कंपनी, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो, पैसा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करत असते. व्हॉट्सॲप आणि फेसबुकचा हाच प्रयत्न आहे. व्हॉट्सॲपला हवा असलेला डेटा देण्यास आपण तयार नसलो तर खुशाल व्हॉट्सॲपमधून बाहेर पडावे सध्यातरी सिग्नल सारखे संपूर्ण सुरक्षित असे अँप आपल्याला उपलब्ध आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!