इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना महामारी ज्या प्रकारे विकसित होत आहे, त्यावरून दिसते की हा विषाणू कधीही संपणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. हा विषाणू लोकांमध्ये स्थानिक आजार होऊन चालूच राहणार आहे, असे रशियातील डब्ल्यूएचओच्या प्रतिनिधी मेलिता वुजनोव्हिक यांनी सोलोविएव्ह लाइव्ह यूट्यूब चॅनलला सांगितल्याची बातमी तास या वृत्तसंस्थेने दिले आहे.
त्या म्हणाल्या, की कोरोना विषाणू एक स्थानिक आजार होण्याच्या मार्गावर आहे. याचा अर्थ असाच होतो की तो कधीही पूर्णपणे संपणार नाही. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे तसेच त्यावर कसा उपचार घ्यावा हे आपल्याला शिकून घ्यावे लागणार आहे. मेलिता वुजनोव्हिक म्हणाल्या, की सर्वात प्रथम संसर्ग रोखण्याची आणि बाधितांची संख्या कमी करण्याची सध्या गरज आहे. असे करण्यास यश मिळाले नाही तर कोरोना विषाणू अनपेक्षित मार्गाने नव्या रूपात समोर येतच राहतील.
मेलिता वुजनोव्हिक सांगातात, आतापर्यंत मिळेलेल्या पुराव्यांवरून ओमिक्रॉन हा विषाणू कोरोनाच्या इतर रूपांपेक्षा कमी गंभीर आहे हे स्पष्ट झाले आहे. परंतु त्यामुळे धोका अजूनही टळला आहे असे समजू नका. कोरोनासंदर्भातील कोणत्याची चुकीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे लक्षात असू द्या.
मेलिता म्हणाल्या, की लसीकरणाशिवाय आता इतर सुरक्षा उपाययोजनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये मास्क घालणे आणि ठराविक काळात ते बदलणे, खोल्या हवेशीर करणे आणि लोकांची गर्दी टाळणे या उपायांचा समावेश आहे.
रशियामध्ये सध्या हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. रविवारच्या गेल्या २४ तासात कोरोना विषाणूचे २७,१७९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १.०७ कोटी झाली आहे. यादरम्यान ७२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांना मिळून मृतांची एकूण संख्या ३,२०,६३४ झाली आहे.