इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण, भाजपने कॅबिनेटमंत्री डॉ. हरक सिंह रावत यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. रावत यांना मंत्रिमंडळातून हटवल्याची सूचना राज्य सरकारने राजभवनाकडे पाठवली आहे. या सर्व घडामोडींमुळे रावत यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येथील विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे,ृ.
उमेदवारांच्या पॅनलवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी याची पुष्टी केली आहे. हरक हे कुटुंबीयांसाठी तीन तिकिटांची मागणी करत होते. ही मागणी फेटाळत केंद्रीय नेतृत्वाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आमदार उमेश शर्मा काऊ यांच्यासोबतच हरक हे दिल्लीत पोहोचले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे हरक म्हणाले.
गेल्या पाच वर्षांपासून भाजपला वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न हरक सिंह रावत यांनी केला आहे. २०१६ च्या राजकीय घटनाक्रमादरम्यान केलेल्या सहकार्यामुळे पक्ष त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत होता. त्यामुळे पक्ष संघटनेतही हरक यांच्याविरुद्ध सूर उमटत होते. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच नाराज असलेल्या हरक यांनी पक्षासमोर आपली विधानसभेची जागा बदलण्यासह सूनेसाठी लँसडॉन जागेची तसेच तीन तिकिटांची मागणी केली होती. केंद्रीय मंत्री आणि राज्याचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांच्यासोबत त्यांची नुकतीच बंद खोलीत चर्चा झाली होती. तेव्हा कुटुंबतील एका व्यक्तीलाच तिकीट दिले जाईल असे पक्षाने स्पष्ट केले होते.
प्रदेश भाजप कार्यालयात कोअर ग्रुपच्या बैठकीत रावत सहभागी झाले नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यांनी तीन तिकीटांची मागणी केल्यानंतर त्यावर तोडगा न निघाल्याने ते नाराज झाल्याशी याचा संबंध जोडण्यात आला. रविवारी सायंकाळी हरक सिंह रावत आपली सून अनुकृती गुसाईं आणि आमदार उमेश शर्मा काऊ यांच्यासोबत दिल्लीत पोहोचले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन ते आपले म्हणणे मांडणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात रविवारी सायंकाळी भाजपची बैठक झाली. हरक सिंह रावत यांच्यासंदर्भात चर्चा झाल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना सहा वर्षांसाठी भाजपमधून बर्खास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याची सूचनाही राज्यपालांना करण्यात आली आहे.
भाजपने माझ्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती मला मीडियाकडून मिळाली आहे. मी दिल्लीत उपस्थित असल्याचे पक्षनेत्यांना ठाऊक होते. तरीही मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली नाही. आता सर्व पैलूंचा विचार करून पुढील निर्णय घेणार आहे, अशी प्रतिक्रिया हरक सिंह रावत यांनी दिली. हरक सिंह रावत हे काँग्रेसमध्ये थोड्याच वेळात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.