India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हुरडा म्‍हणजे नक्‍की काय? खरा कसा ओळखायचा? हुरडा पार्टी कशी करायची? घ्या जाणून सविस्तर…

India Darpan by India Darpan
December 28, 2022
in व्यासपीठ
0

जगदीश देवरे, नाशिक
घरातली रोजची भाजी पोळी खावून घरातले खवय्ये कंटाळतात, तर दुसरीकडे रोज किचनमध्‍ये नित्‍याचाच स्‍वयंपाक करून गृहिणींनाही कंटाळा येतो. हल्‍ली अशा वेळी मग “चला आज बाहेर जावू” असा सूर कुठून तरी ऐकू येतो आणि मग पुढच्‍या काही मिनीटात बाहेर जेवायला जाण्‍याचा प्‍लॅन ठरतो. पण हल्‍ली बाहेर हॉटेलमध्‍ये देखील तेच आहे. तिथल्‍या मेनू कार्डावर ‘पनीर’ या पदार्थावर वेगवेगळे संस्‍कार करून बनवलेल्‍या असंख्‍य डीश, पंजाबी आणि दाक्षिणात्‍य पदार्थांचा विभाग आणि स्‍टार्टर पासून आईस्‍क्रीम पर्यंत बरेच काही सापडत असले तरी खवय्यांना नित्‍यनियमानंतर या पदार्थांचाही कंटाळा यायला लागतो. मग अशावेळी खास करून वर्षाच्‍या अखेरीस येणारा आणि अस्‍सल ग्रामीण ओळख असलेला ‘हुरडा’ हल्‍ली अनेकांसाठी अलाउद्दीनच्‍या कथेतील चिरागसारखा जादूई वाटायला लागतो. कुछ हटके खाण्‍याच्‍या आवडीला दिशा सापडते आणि ‘हुरडा पार्टी’ नावाची दुकाने लावून बसलेल्‍या डेस्‍टीनेशनकडे अनेकांची पावले वळायला लागतात.

हा हुरडा म्‍हणजे नक्‍की काय? हे जाणून घेणे देखील महत्‍वाचे आहे. विकीपिडीयावर हुरडा या शब्‍दाची शास्‍त्रोक्‍त ओळख आपल्‍याला वाचायला मिळते. या माहितीनुसार हुरडा म्हणजे ज्‍वारीचे कोवळे दाणे. ज्वारीच्‍या पिकावर कणीस लागल्यानंतर परागीकरण झाल्यावर साधारण ३० ते ४० दिवसातील दाणे हे कोवळे समजले जातात. रंगाने हिरवे असलेले हे दाणे आकाराने तयार ज्वारी दाण्‍यापेक्षा थोडे मोठे आणि रसदार असतात. ज्वारीचे कणीस निखार्यावर किंवा शेकोटीत भाजून घेतल्‍यानंतर हे भाजलेले कणीस पोत्यावर चोळून हे कणसापासून वेगळे केले दाणे म्‍हणजेच हुरडा आणि ते सगळ्यांनी एकत्र येवून खाणे म्‍हणजेच हुरडा पार्टी अशी साधी आणि सोप्‍पी ओळख विकीपिडीयावर करून देण्‍यात आलेली आहे.

#हुरडा_पार्टी pic.twitter.com/WyYZwUs3JG

— Sachin khatke (@sachin_khatke) February 10, 2021

शेतातल्‍या अस्‍सल चवदार हुरड्याने हल्‍ली व्‍यावसायिकतेचा रंग लावून घेतल्‍यानंतर त्‍याची गुणवत्‍ता बदलते आहे. मागणी आणि लोकप्रियता वाढल्‍याने राखेतल्‍या गरमागरम आचेवर भाजला जाणारा हुरडा हल्‍ली तव्‍यावर येवून पोहोचलाय. खरेतर ज्‍वारी आणि थंडी यांच्‍यात अतिशय जिव्‍हाळ्याचे नाते आहे. म्‍हणजे असं की, हिवाळ्यात थंडीचा पारा एकदा का घसरायला सुरूवात झाली, की ज्वारीच्‍या पीकाला जोर येतो. ज्‍वारीच्‍या कणसात कोवळे दाणे दिसायला सुरूवात होते आणि मग त्‍यावेळी ज्‍वारी ‘हुरड्यावर आली’ असे म्‍हणतात. अशाप्रकारे साधारण डिसेंबर ते जानेवारी आणि काही ठिकाणी फेब्रुवारीपर्यन्‍त ज्वारीने हुरड्यावर येण्‍याचा सिझन सुरू असतो.

हुरडा कसा भाजावा याचे एक शास्‍त्र आहे. हुरडा शेतातल्‍या एका मोकळ्या जागेत तयार केलेल्‍या खड्यात शेणगौरीवर भाजला जातो आणि त्‍यामुळे त्‍याची चव निराळीच असते. शेतकरी शेतात एक चांगली जागा निवडून तिथे एक छोटासा गोलाकार खड्डा तयार करतात आणि त्‍यात रानगौ-या टाकतात. रानगौ-या म्‍हणजे शेतात वाळून पडलेलं गाय-बैलाचं शेण. कोवळ्या आणि दुधाळ ज्‍वारीच्‍या दाण्‍यांची कणसं पिकांवर हुडकून ती लांब देठासहीत खुरडली जातात आणि रानगौरीच्‍या मंद विस्‍तवावर छान भाजली जातात. कणसाला लांब देठ यासाठी ठेवतात की त्‍यामुळे हुरडा भाजतांना तो देठ धरून कणीस सर्व बाजुने चांगले भाजले जाते आणि हाताला चटकेही बसत नाहीत. कणसाच्‍या सर्व बाजूंचे दाणे नीट भाजले की ते कणीस विस्‍तवातून बाहेर काढले जाते आणि खाली ठेवलेल्‍या पोत्‍यावर गरमागरम कणीस दोन्‍ही हातांनी रगडून त्‍यातील ज्‍वारीचे चवदार दाणे बाहेर काढले जातात. हुरड्यातले दाणे जितके कोवळे, जितके दुधाळ आणि नरम, तितका हुरडा रूचकर आणि स्‍वादिष्‍ट लागतो. जाडसर आणि टणक होवू लागलेले हुरड्याचे दाणे हुरडा पार्टीची मजा घालवणारे ठरतात.

हुरडा पार्टी ……सोलापूर pic.twitter.com/SrgEYnAm0V

— Vijaykumar Hatture 🇮🇳 (@vijayhatture) January 18, 2020

असा हुरडा खातांना हात आणि तोंडाला काळं फासलं जात असलं तरी त्‍यातल्‍या चवीमुळे हुरडा खाण्‍याचा मोह आवरला जात नाही. या हुरड्याच्‍या सोबतीला त्‍यावर भुरभूरलेला लिंबाचा रस, शेंगदाण्‍याच्‍या कुटाची चटणी, लसून खोब-याची चटणी आणि गोड दही असले की हुरड्याची चव आणखी व्दिगुणीत होते. हुरडा खाऊन झाल्‍यावर पाणी पिऊ नये असा प्रघात आहे. म्‍हणून मग सोललेला ऊस खावून तहान भागवली जाते. थंडीच्‍या दिवसात गुळापासून बनवलेल्‍या गुडीशेव रेवड्या, आंबडगोड बोरं, पेरू,आवळा, स्‍वीट कॉर्न हे इतर पदार्थ हुरडा पार्टीत आणखी चवदार ठरतात. जुन्‍या जाणकार माणसाला हुरड्याची माहिती विचारली तर पुर्वीच्‍या काळात महिना महिनाभर शेतात असा हुरडा तयार व्‍हायचा अशी माहिती मिळते. सकाळी उठल्‍यावर विझलेल्‍या चुलीत पुन्‍हा नव्‍याने गौ-या टाकल्‍या जायच्‍या आणि हुरडा भाजला जायचा.

ज्‍वारीच्‍या हुरड्याप्रमाणे साधारणपणे याच संक्रातीच्‍या आसपास गव्‍हाच्‍या कोवळ्या ओंब्‍या भाजून हुळा खाणे, हरभरा भाजून टहाळ खाणे हा देखील हुरडापार्टीचाच एक प्रकार आहे. शेतात खाऊन शिल्लक राहिलेलेला ज्‍वारीचा हुरडा कापडात ठेवून त्‍याला गाठ बांधून घरी नेतात आणि त्‍याला नीट वाळवून ठेवतात. मग ऐन उन्हाळ्यात या वाळलेल्या हुरड्याच्या घुगर्‍या करून देखील खातात. काही ठिकाणी मेथकुट नावाचा पदार्थ बनवाला जातो त्‍यात असाच वाळलेला हुरडा घातलेला असतो.
ग्रामीण भागात हुरड्याच्‍या चुलीभोवती असे सगळे कुटूंब एकत्र बसून आनंद घेतांना बघायला मिळत असले तरी शहरी भागातली माणसं गावाबाहेर उभारलेल्‍या एखाद्या हुरडा सेंटरवर जावून हुरडा पार्टी करतात तेव्‍हा सहाजिकपणे काळाचा बदल त्‍यातही दिसायला लागतो. अशा सेंटर्सवर असलेले अॅडव्‍हेंचर गेम्स, मुलांसाठीच्‍या खेळण्‍या, रेन डान्‍स, स्विमींग टँक, बोटींग, सेल्‍फी पॉईन्‍टस ही साधने हुरडा पार्टीच्‍या जोडीला असल्‍याने संपुर्ण दिवसाचे प्रती व्‍यक्‍ती ८०० ते ९०० रूपयांचे पॅकेज सत्‍कारणी लागल्‍याचा आनंद हल्‍ली लोक मिळवतांना दिसतात. यात खरा ‘हुरडा’ बघायला आणि खायला मिळतोच असे नाही परंतु, मित्र आणि आप्‍तस्‍वकींयासोबतची एक ‘पार्टी’ मात्र नक्‍की अनुभवयाला मिळते.

थेट रानातून #हुरडा_पार्टी#सुख #दोस्ती #sunday pic.twitter.com/dXTKv2y57D

— Vikram Shinde (@Shindes_Speaks) January 30, 2022

What Is Hurda and Its Party How to know original Hurda by Jagdish Deore
Food Trend Winter Snacks Meal Farm


Previous Post

नाशिकच्या भूमीपुत्राच्या नेतृत्वात रिझर्व्ह बँकेचा इतिहास पुस्तकरुपात

Next Post

विधान भवनात या दिवशी लागणार बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र

Next Post

विधान भवनात या दिवशी लागणार बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group