भोगी, संक्रांत आणि किंक्रांत नक्की काय असते
पंडित दिनेश पंत, इंडिया दर्पण वृत्तसेवा
दरवर्षी 14 जानेवारीला संक्रांत सण साजरा केला जातो. हा सण 3 दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. या तिन्ही दिवसाचे वेगवेगळे असे महत्त्व आहे. ते नेमके आपण जाणून घेऊ…..
भोगी
संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी सण साजरा केला जातो. हिवाळ्यात येणारा वर्षातला पहिला सण भोगी हा आनंदाचा आणि छान छान खाण्याचा सण असतो.
भोगीची भाजी
ऐन थंडीमध्ये येणाऱ्या या सणाच्या दिवशी स्निग्ध व उष्ण पदार्थांनी बनलेली भोगीची भाजी किंवा लेकुरवाळी भाजी अथवा खेंगट करण्याचा प्रघात आहे. गाजर, वांगी, मटार, घेवडा, ओले हरभरे यांची एकत्र चविष्ट भाजी केली जाते. सोबत बाजरीची तीळ घालून भाकरी केली जाते. त्यासोबतच लोणी, पापड, भरीत, मसाला खिचडी असा सणसणीत चविष्ट बेत असतो.
मकर संक्रांत
14 जानेवारीला संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी संक्रांती या देवीने संकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला, अशी पौराणिक मान्यता आहे. यास्तव संक्रांत साजरी केली जाते. पोंगल, लोहरी, बिहू अशा विविध नावाने भारतभर शहरी तसेच ग्रामीण भागात हा सण उत्साहात साजरा केला जातो.
संक्रांत व सुगडी पूजन
वर्षातील पहिला संक्रांत सण अतिशय शुभ मानला गेलेला आहे. यादिवशी उत्तरायण सुरू होते. या दिवशी दिवस व रात्र समान असतात. नंतर मात्र दिवस मोठा होत जातो. संक्रांतीच्या दिवशी सुगडी पूजनाला विशेष महत्त्व आहे. सुगडी म्हणजे मातीची छोटी मडकी होय. हिवाळ्याच्या या खरीप हंगामात शेतात आलेल्या ऊस, हरभरा, बोरे, शेंगा, गाजर वटाणा, कणीस हे सर्व सुगडीमध्ये ठेवून त्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो. 5, 7, 9 अशा संख्येमध्ये सुगडी पूजन केले जाते. नंतर गृहिणी या सुगड यांचे वाण एकमेकींना देतात. पुढे रथसप्तमीपर्यंत गृहिणींच्या हळदी-कुंकू कार्यक्रम सुरू असतात.
हलव्याचे दागिने
नववधूच्या पहिल्या संक्रांतीला नूतन वधूवरांना हलव्याचे दागिने घातले जातात. सासर व माहेर दोन्हीकडून हलव्याचे दागिने बनवण्यासाठी गोडशी चढाओढ असते.
किंक्रांत अथवा कर
संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत सण साजरा केला जातो. किंकरआसुर राक्षसाचा वध या दिवशी संक्रांती देवीने केल्याने या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी कोणाशी वाद घालू नये, अशी पौराणिक मान्यता आहे. संक्रांतीला काळी साडी नेसण्याचा प्रघात आहे. कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि थंडीत उबदार असतो.
संक्रांतीची पतंगबाजी
संक्रांत सणाला ठिकठिकाणी मोठ्या संख्येने पतंग उडवले जाते. यानिमित्त उन्हात पतंगबाजी केल्याने उबदारपणा तर जाणवतोच, सोबत सूर्यकिरणतील विटॅमिन डी देखील शरीराला मिळते.