इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्ही चार तास किंवा त्याहून अधिक वेळ टिव्ही पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण इतका वेळ टिव्ही बघणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. हे आम्ही म्हणत नसून, एका अभ्यासात असे आढळून आले आहे. दररोज चार तास किंवा त्याहून अधिक वेळ टिव्ही पाहिल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका ३५ टक्क्यांनी वाढतो. हे संशोधन ‘युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी’मध्ये प्रकाशित झाले आहे.
अमेरिकेतील ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. सेटर कुंटसर यांच्या मते, “आमच्या अभ्यासाचे निष्कर्षानुसार दीर्घकाळ टिव्ही पाहण्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. मग तुम्ही जरी तुम्ही शारीरिकरित्या सक्रिय असाल तरीपण हा धोका कमी होत नाही.” म्हणून, जेव्हाही तुम्ही टीव्ही बघत असाल तेव्हा मध्ये मध्ये ब्रेक घ्या. अर्ध्या तासाच्या अंतराने उभे राहा आणि स्ट्रेचिंग करा. टीव्ही पाहताना जंक किंवा फास्ट फूड खाऊ नका.
एकाच जागी तासनतास बसून कोणतेही काम करत राहिल्याने आपल्याला शरीराला कोणता ना कोणता धोका निर्माण होतच असतो. अनेकांना खूप वेळ टिव्ही बघत बसणे आवडते. अशांसाठी हे वैद्यकीय दृष्टीकोनातून संशोधन करण्यात आले आहे. या अभ्यासात टिव्ही पाहणे आणि शिरांसंबंधीचा थ्रोम्बोइम्बोलिझम (VTE) यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासानुसार फुफ्फुसात, पायात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. पल्मोनरी एम्बोलिझम या आजाराचा धोका वाढतो. हा अभ्यास तीन वेगवेगळ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामध्ये ४० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या एकूण १ लाख ३१ हजार ४२१ लोकांचा अभ्यास करण्यात आला आहे. या लोकांमध्ये मात्र ही समस्या दिसून आलेली नाही.