वर्धा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वत:वरील अन्यायाची तक्रार मांडण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याकडे गेलेल्या चोवीस वर्षीय युवतीवर संबंधित कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उघडकीस आला आहे. या घटनेने पोलिस विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.
एका प्रकरणाशी संबंधित तक्रार देण्यासाठी ही युवती ५ ऑगस्ट २०२१ रोजी पोलिस ठाण्यात गेली. त्यावेळी,‘तू माझ्याशी मैत्री कर. मी तुझे प्रकरण निकाली काढून देतो’, अशी ऑफर पोलिस कर्मचाऱ्याने दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने घरी एकटीच असल्याची संधी साधून तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले. या खाकी वर्दीतील बहाद्दराने एवढ्यातच न थांबता एक व्हिडिओपण तयार केल्याचे युवतीने नमूद करीत त्या आधारे सतत ब्लॅकमेल केले व वारंवार अत्याचार केला. हा संपूर्ण प्रकार युवतीने तक्रारीच्या स्वरूपात मांडला आहे.
पोलिस कर्मचारी वारंवार अत्याचार करायचा. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून पीडितेने पुढे येत संपूर्ण प्रकार मांडला आहे. हा प्रकार तिने पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीला सांगितला. त्यावर पत्नीने त्या युवतीलाच धमकी दिल्याचेही पुढे आले आहे. पीडितेने २१ डिसेंबरला पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ही तक्रार पोलिस अधीक्षक यांच्याकडे वर्धा येथे पाठविण्यात आली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याची वर्ध्यात तात्पुरती बदली झाली व हिंगणघाटला प्रभारी ठाणेदार नेमण्यात आले. परत तक्रार झाल्यावर त्या कर्मचाऱ्यावर पाच वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wardha Young Girl Rape by Police Crime