इंडिया दर्पण विशेष लेखमाला
व्हिजन नाशिक
टुरिस्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र
विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले नाशिक हे पर्यटनाच्या क्षेत्रात तर महाराष्ट्राची राजधानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कदाचित आपणलाही त्यास सहमत असाल. धार्मिक, साहसी, निसर्ग, वन्यजीव, वैद्यकीय अशा सर्वच प्रकारचे पर्यटन नाशिकमध्ये आहे.

ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: [email protected]
WhatsApp: 9011009700
मित्रांनो, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगांवी प्रवास करतांना मला आमचे देश-विदेशातील ग्राहक नेहमी विचारतात कि, तुम्ही तुमच्या कंपनीसाठी नाशिक शहराची निवड का केली? आणि नाशिक मध्ये फॅमिली सोबत ‘वीकेंड’ ला फिरायला चांगली पर्यटन स्थळे आहेत का?
मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, प्रत्येक ऋतू मध्ये नाशिक इतके चांगले, निरोगी आणि प्रदूषणमुक्त वातावरण दुसऱ्या कुठल्याही शहरात आहे का? सुदैवाने आपल्या नाशिक मध्ये अजूनही वर्षभर संतुलित हवामान असते. हिवाळ्यात गोड-गुलाबी थंडीचा अनुभव, नाशिकचा उन्हाळा देखील इतर शहरांच्या मानाने सुसह्यच आणि नाशिककर तर पावसाळ्याची वाट पाहत असतात, परिसरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे, देखणे डोंगर-दऱ्या, सुंदर धबधबे तर ‘विकेंड’ ला हाऊसफुल्ल! नाशिकमध्ये विविध प्रकारच्या पर्यटनासाठी अनेक पर्याय आहेत, उदा. धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, साहसी पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, कृषी पर्यटन, वाईनरी पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन (इको टुरिजम), आरोग्य किंवा वैद्यकीय पर्यटन. महाराष्ट्रातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांपैकी ‘ऑल व्हेदर यूनिक ट्रॅव्हल एक्सपीरियन्स’ देणारे सर्वात महत्वाचे शहर म्हणजे नाशिक.
नाशिक येथे दर बारा वर्षांनी भरणारा ‘सिंहस्थ’ कुंभमेळा हा तर जागतिक पातळीवर साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव. कुंभमेळा नाशिकसह संपूर्ण भारतात केवळ हरिद्वार, उज्जैन आणि अलाहाबाद येथेच भरतो. या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी साधू, महंत, भाविक आणि जगभरातील पर्यटक आवर्जून येतात. पृथ्वीवरील सर्वांत मोठा आणि शांततेत पार पडणारा कुंभमेळा हा धार्मिक यात्रेकरूंचा जगातील सर्वात मोठा उत्सव असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद (UNESCO) ने घोषित केले आहे. ‘युनेस्को’ ने कुंभमेळ्यास ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’ यादीत अंकित केले आहे. कुंभमेळ्यासाठी आवश्यक उपाययोजना व संवर्धन ‘युनेस्को’ करणार असल्याने नाशिकचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक वाढलेला आहे. धार्मिक पर्यटनासाठी भाविक पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले पवित्र रामकुंड, श्रीगंगा-गोदावरी मंदिर, सिंहस्थ गोदावरी मंदिर, अतिशय सुंदर बांधकाम असलेले देखणे ‘काळाराम’ मंदिर, सीता गुंफा, पुरातन बालाजी मंदिर, नारोशंकर मंदिर, मुरलीधर मंदिर, कपालेश्वर मंदिर, सुंदरनारायण मंदिर, मुक्तिधाम, भक्तिधाम (कैलासमठ), स्वामीनारायण मंदिर, पंचवटी आणि तपोवन परिसरातील महत्वपूर्ण स्थळांना अवश्य भेट देतात.
नाशिक पासून जवळच असलेल्या गोदावरी नदीच्या उगम स्थानी, ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वैशिष्ठयपूर्ण मंदिर म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान, येथे सुद्धा दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. विविध प्रकारच्या पूजा-विधी साठी भाविक त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर येत असतात. त्र्यंबकेश्वर मध्ये पवित्र कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार, ब्रह्मगिरी, गोरखनाथ गुफा, निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, निल पर्वत, श्री गजानन महाराज संस्थान मंदिर, श्री स्वामी समर्थ गुरुकुल, अंजनेरी इत्यादी आध्यात्मिक स्थाने भेट देण्यासारखी आहेत. शहरापासून जवळच श्री सप्तशृंग गड (वणी), सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कपिलधारा इत्यादी काही महत्वपूर्ण प्रेक्षणीय धार्मिक पर्यटन स्थळे देखील आहे. श्री सप्तशृंग गड (वणी) म्हणजे साडेतीन शक्ती पिठातील एक महत्वाचे आदिशक्ती स्थान, दर पौर्णिमेला आणि नवरात्री मध्ये लक्षावधी भाविक येथे दर्शनाला येत असतात. पौराणिक महत्व असलेले ‘सर्वतीर्थ टाकेद’ पक्षीराज जटायूचे भारतातील एकमेव मंदिर. सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान श्रीक्षेत्र कपिलधारा, कावनई असून येथे सुद्धा कुंभमेळा भरतो.
नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक स्थान गिर्यारोहणासाठी (ट्रेकिंग) तर सर्वोत्तम. हिमालयापेक्षा हि प्राचीन असलेला आणि जैवविविधतेने नटलेला महाराष्ट्राचा पश्चिमघाट तथा सह्याद्री पर्वतरांग यांना ‘युनेस्को’ च्या ‘जागतिक नैसर्गिक वारसा’ स्थळांमध्ये महत्वाचे स्थान मिळाले आहे. सह्याद्रीच्या मुख्य पर्वत रांगेचा नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक लांबीचा भाग येतो. संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ३५० हुन अधिक किल्ल्यांपैकी साधारण ७० गड-किल्ले आणि गिरिदुर्ग आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. नाशिक जिल्ह्याचा भुगोल आणि एकूण वातावरण, ट्रेकिंग, रनिंग, मॅरेथॉन, स्विमिंग, सायकलिंग अश्या विविध खेळ-सरावांसाठी अत्यंत पोषक आहे. साहसी पर्यटन करणाऱ्यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे कळसूबाईचे शिखर, सह्याद्रीचे मस्तक असलेले सर्वाधिक उंचीचा साल्हेर – मुल्हेर किल्ला, मांगी-तुंगी, धोडप किल्ला, घोटी जवळील अलंग, मदन आणि कुलंग किल्ले, ब्रह्मगिरी, अंजनेरी, रामशेज, हरिहर गड , विश्रामगड, सातमाळा पर्वतरांग, कसारा घाट, माळशेज घाट, दुगारवाडी धबधबा, सोमेश्वर, भंडारदरा, ‘अशोका वॉटरफॉल’ आणि बुरुंडी धबधबा इत्यादी. पावसाळ्यामध्ये ह्या पर्वतरांगां मधील निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलते आणि याच पर्वतरांगां मधून वाहणारे धबधबे म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू. नाशिकपासून जवळच असलेले ‘नांदूर मध्यमेश्वर’ हे विविध जातीच्या रंगीबेरंगी पक्ष्यांचे अभयारण्य आहे, इथे आपल्याला स्थलांतरित पक्षीही पाहायला मिळतात. निसर्गप्रेमी, प्रक्षी-प्राणी निरिक्षक या ठिकाणी अवश्य भेट देतात. या व्यतिरिक्त निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय अशी साधारण ४० धरणे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळेच कुठल्याही प्रकारच्या साहसी पर्यटनाला जाण्याआधी गिर्यारोहक सरावासाठी नाशिकला प्राधान्य देतात.
नाशिक हे एक प्रसिद्ध ऐतिहासिक शहर सुद्धा आहे. नाशिक मधील ‘पांडव लेणी’ पाहण्यासारखी आहेत, ह्या लेण्यांमधील शिलालेखां मध्ये ऐतिहासिक माहिती आणि वर्णने आढळतात. जवळपास दोन हजार वर्षे पूर्वीच्या या लेण्यांनां ‘बौद्ध लेणी’ किंवा ‘त्रिरश्मी लेणी’ असंही म्हणतात. ह्या व्यतिरिक्त नाशिक मध्ये ‘चामर लेणी’ हे जैन बांधवांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणास ‘गजपंथ’ म्हणून देखील ओळखले जाते. नाशिक पासून साधारण १२ किमी वर असलेल्या विल्होळी येथील निसर्गरम्य परिसरात, अतिशय सुंदर असे ‘धर्मचक्र प्रभाव तिर्थ’ ला भेट देण्यासाठी भाविक व पर्यटक संपूर्ण भारतातून येतात. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये समावेश असलेला, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांचा एकाच दगडात कोरलेला १०८ फूट उंच मूर्तीचा सर्वात मोठा जैन पुतळा, सटाणा जवळील ‘मांगी-तुंगी’ च्या पर्वतरांगेत आहे. पर्यटकांनी येथे सुद्धा अवश्य भेट दिली पाहिजे. स्वातंत्रवीर सावरकरांचा जन्म नाशिक मधील भगूर येथे झाला होता, येथील त्यांचे स्मारक इतिहासप्रेमी पर्यटकांसाठी एक प्रेरणादायी स्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील ‘हिलस्टेशन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथे ‘धम्मगिरी’ हे ‘आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र’ असून जगभरातील साधक येथे ‘मौन साधना’ म्हणजेच ‘विपश्यना’ करण्यासाठी साठी येतात. येथील तपोभूमीमध्ये दीर्घकालीन शिबिरे देखील चालतात. आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी जगातील पहिले पॅगोडा निसर्गयरम्य इगतपुरी मध्येच स्थापन केले, हे विशेष.
नाशिक पासून सुमारे २० कि.मी. अंतरावर असलेल्या माळेगाव (सिन्नर) एमआयडीसी मध्ये, भारतातील एकमेव असे विविध खनिजांचे ‘गारगोटी’ संग्रहालय आहे. या ठिकाणी अतिशय मौल्यवान असे विविध प्रकारचे खनिज, स्फटिक, अद्वितीय रंगीबेरंगी खडक पाहायला मिळतात. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर ‘अंजनेरी’ परिसरात, ‘इंडियन न्यूमिस्मॅटिक, हिस्टोरिकल अँड कल्चरल रिसर्च फाउंडेशन’ हे आशिया खंडातील एकमेव असे ‘नाणे संग्रहालय’ असून येथे भारतीय मुद्राशास्त्र (चलनी नोटा, नाणी), पुरातत्व शास्त्र, संस्कृती, इतिहास आणि संशोधन यांची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. येथे पर्यटक, शालेय विद्यार्थी आणि अभ्यासक नियमित भेट असतात. आशिया खंडातील सर्वात मोठे तोफखाना केंद्र (आर्टिलरी सेंटर) देवळाली येथे असून भारतीय सैन्य दलातील जवान आणि अधिकारी यांना या ठिकाणी कठोर प्रशिक्षण दिले जाते. आर्टिलरी सेंटरमध्ये पर्यटकांचे आकर्षण असलेले एक युद्ध स्मारक आणि तोफखाना संग्रहालय देखील आहे, त्याद्वारे आपणांस भारतीय सेनेच्या इतिहासाची महत्वपूर्ण व प्रेरणादायी माहिती मिळते.
नाशिकला एक विशिष्ठ कृषीसंस्कृती आहे. नाशिकहुन दररोज हजारो टन ताजा हिरवा भाजीपाला, टमाटे, कांदे आणि हंगामी फळे यांचा मुंबईला पुरवठा होत असतो, म्हणूनच नाशिकला ‘मुंबईचे किचन’ देखील म्हटले जाते. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे आणि वाईन तर जगप्रसिद्ध आहेत. नाशिकचा ‘ग्रेप आणि वाईन कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून सर्वत्र नावलौकिक आहे. नाशिक परिसरात सुला वाईनयार्ड, सोमा व्हिलेज, यॉर्क वाईनरी, व्हॅलोनी वाईनयार्ड, ग्रोव्हर झम्पा, चंदोन इंडिया वाईनयार्ड इत्यादी सुमारे ३० वाईनरी आहेत. मुंबई-पुणे आणि गुजरात च्या पर्यटकांचे तर ‘विकेंड ट्रिप’ साठी नाशिक पहिल्या पसंतीचे ठिकाण आहे. ‘कृषी पर्यटना’ साठी नाशिक इतके चांगले व विविध पर्याय कोठेही नाही.
नाशिकचा ‘आरोग्य आणि वैद्यकीय पर्यटन’ साठी हि नावलौकिक असून केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातील रुग्ण येथील तज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी नियमित येत असतात. नाशिकमध्ये कॅन्सर, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हार्ट सर्जेरी, डेंटल, इएनटी, इत्यादी विविध आजारांवर ‘मेडिकल ट्रीटमेंट्स’ साठी ‘मल्टि-स्पेशिअलिटी’ हॉस्पिटल्स आहेत. नाशिक मधील आल्हाददायक वातावरणामुळे रुग्णास आणि त्यांच्या नातेवाईकांना येथे काही दिवस राहावेसे वाटते. माझ्या ‘व्हिजन नाशिक’ ह्या लेखमालिकेतील पूर्वीच्या लेखांमध्ये “कृषी पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटन” विषयी सविस्तर माहिती दिली असून, आपण हे दोन्ही लेख नक्की वाचावेत, अशी आशा मी व्यक्त करतो.
आपले नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले, नऊ डोंगरांनी वेढलेले असून; त्याला मनमोहक निसर्ग सौन्दर्याचा आणि आल्हाददायक हवामानाचा वरदान लाभलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळे ही पर्यटन स्थळांमधील अष्टपैलुत्व गुण सिद्ध करतात. परिसरातील आकर्षक रिसॉर्ट्स, वॉटर पार्क्स, फ्लॉवर गार्डन, वेलनेस सेंटर्स, योगाभ्यास केंद्र, आरोग्यधाम, मंदिरे, वाईनरी प्रकल्प, मिसळसाठी प्रसिद्ध असलेली हॉटेल्स, इत्यादी विविध स्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात. आजकाल ‘डेस्टिनेशन वेडींग’ हि संकल्पना चांगलीच रुजली असून नाशिक बाहेरील व्यावसायिक, उद्योजक, हौशी मंडळी आणि सेलिब्रिटी सुद्धा नाशिक मध्ये ‘प्री वेडींग शूट्स’ आणि ‘डेस्टिनेशन वेडींग’ साठी आवर्जून येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुंदर लोकेशन्स आणि प्रदूषणमुक्त वातावरणामुळे टीव्ही सिरियल्स, वेब सिरीज आणि चित्रपटातील कलाकार मंडळी शुटिंगसाठी नाशिकला नियमित येत असतात. नाशिकला भेट देणाऱ्या पर्यटकांना नाशिक कधीही निराश करीत नाही, मग ते पर्यटक धार्मिक असोत किंवा हौशी. संपूर्ण जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळे तुम्हाला कायम सोबत राहतील अश्या आठवणीत देतात.
मला वाटते कि, आपल्या नाशिकची इतकी बलस्थाने असतांना “नाशिकच का”? हा प्रश्नच येत नाही. मुंबई-पुणे नंतर नाशिक हे वेगाने वाढणारे शहर असून त्याच्या विस्ताराचे सुयोग्य नियोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा वेगवेगळ्या ‘टुरिस्ट क्लस्टरर्स आणि टुरिस्ट सर्किट’ द्वारे नियोजनबद्ध विकास केल्यास पर्यटनाद्वारे रोजगार निर्मिती होऊन स्थानिकांचा विकास अजून चांगल्या प्रकारे होवू शकतो. नाशिकला “टुरिस्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र” करण्यासाठी सर्व पर्यटन स्थळांचा सर्वसमावेशक असा ‘एकात्मिक पर्यटन विकास आराखडा’ तयार करण्याची आणि सुयोग्य ‘मार्केटिंग कॅम्पेनची’ अत्यंत गरज आहे. नाशिककरांनो आपणास काय वाटते?
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
पियुष सोमाणी
विशाल जोशी (सह लेखक)
Vision Nashik Tourism capital of Maharashtra by Piyush Somani