अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग १३)
जडभरत आणि सौवीर राजाची कहाणी!
श्रीविष्णु पुराणच्या कालच्या भागात सूर्य आणि त्याचे इतर अनेक सहायक अहोरात्र कसे व कोणते कार्य करतात? सूर्यशक्ती आणि वैष्णवी शक्ती यांच्यात कोणता फरक आहे ? आणि या विश्वात जे काही दृश अथवा अदृश्य आहे ते विष्णूमय कसे आहे याची माहिती ऐकली. आजच्या भागांत श्री विष्णु पुराणातील जडभरत आणि सौवीर राजाची कहाणी! पाहणार आहोत. जड बुद्धीच्या जडभरत याने सौवीर नावाच्या राजाला आत्मज्ञानाचा उपदेश कसा केला त्याची ही कहाणी आहे.
मैत्रेयांनी विचारले “हे भगवान! मी आपणास जे जे विचारले ते ते सर्व आपण कथन केले. आता मला राजा भरताचा वृत्तान्त ऐकावयचा आहे. तो योगी होता व शालग्राम क्षेत्रात राहून परमात्म्याच्या ध्यानात सतत मग्न असे. तरीही त्याला पुनर्जन्मास जावे लागले, ते कशामुळे?”
श्री पराशर सांगू लागले “तुमचे म्हणणे बरोबर आहे. नवखंड पृथ्वीपती भरत शालग्राम क्षेत्रात राहून तपश्चर्या करीत असताना एके दिवशी नेहमीप्रमाणे ते नदीवर स्नानास गेले होते. त्याच सुमारास तिथे एक गाभण हरिणी (दिवस पूर्ण भरलेली) पाणी पिण्यासाठी आली. ती पाणी पीत असताना कुठूनशी भयानक अशी सिंहगर्जना ऐकू आली.
तेव्हा भीतीमुळे तिने उडी मारली पण तिच्या पोटचा गर्भ गळून पडला. ते शावक भरताने उचलून घेतले परंतु ती हरिण मात्र प्रवाहात सापडून वाहून गेली; मग भूतदयेपोटी भरत त्या पाडसाला घेऊन आश्रमात परतले.
त्यांनी त्याचे पालनपोषण करण्यास आरंभ केला. त्याचा हरप्रकारे सांभाळ करता करता पुढे ते त्यात गुंतत चालले. त्यांचा बराचसा वेळ त्यातच निघून जात असे.
त्याचा परिणाम असा झाला की, त्यांचे चित्त नेहमी त्या पाडसाभोवतीच फिरत असे. असे चालले असताना राजाच्या देहत्यागाची वेळ जवळ येऊन ठेपली. त्या वेळी आसनावर बसल्या बसल्या जवळच बसलेल्या पाडसाच्या पाठीवर हात फिरवीत व त्याला डोळे भरून पाहात असताना भरतांनी देह सोडला.
त्याच्या मनात मरणसमयी हरीण असल्यामुळे त्यांना पुढचा जन्म हरणाचा झाला पण पूर्वपुण्याई पदरी होती म्हणून ते हरीण शालग्राम क्षेत्री बाढले. त्यानंतर ते ब्राह्मण कुलात जन्मले परंतु त्यांना आपल्या पूर्वीच्या जन्माचे स्मरण असल्यामुळे ते नेहमी समाजापासून लांबच रहात. लौकिक व्यवहार व आचार यांची त्यांना पर्वाच नव्हती.
मान-सन्मान हा योग्यांसाठी हानिकारक असतो व निंदानालस्ती झाली तर योगात वेगाने प्रगती होते हे तत्त्व जाणत असल्यामुळे जे काही सापडेल ते खाऊन व काही उद्योग न करता कुठेतरी पडून ते काळ चालवीत असत. भाऊबंद तर त्यांची विचारपूसही करीत नव्हते.
लोक मात्र त्यांना खायला-प्यायला घालून मेहनतीची कामे करवून घेत असत.
अशाप्रकारे काळ चालला असता एकदा एका मांत्रिकाने त्यांना धरून देवीपुढे बळी देण्याकरीता नेले होते. तेव्हा त्या निष्पाप योग्याला बळी देण्यासाठी आणलेला पाहून देवीने संतापाने त्या मांत्रिकाचाच बळी घेतला होता.
पुढे एके वेळी सौवीर देशीचा राजा बाहेर जात असताना एक भोई पालखीसाठी मिळाला नाही म्हणून शिपायांनी या ब्राह्मणाला धरून वेठीला जुंपला. त्यावेळी राजा महर्षी कपिलमुनींचा उपदेश घेण्यासाठी निघाला होता. ती पालखी उचलून चौघे भोई चालू लागले परंतु भरताला त्या कामाची सवय नसल्यामुळे त्याच्या व इतरांच्या गतीत फरक पडू लागला व परिमाणतः ती पालखी डळमळू लागली व राजाला हिसके बसू लागले. तेव्हा पालखी थांबवून राजाने चौकशी केल्यावर त्याला कारण कळले. (मग) त्यानेतेव्हा भरताला विचारले की, “तू एवढा भला दांडगा असून ही पालखी उचलणे तुला जड जाते काय?”
त्यावर भरताने उत्तर दिले की, “अरे राजा! तू म्हणालास की, मी भला दांडगा आहे; पण तसे काही नाही. हे शरीर भले दांडगे आहे व त्याच्या खांद्यावर पालखीचा दांडा आहे. आत तर राजाचा देह आहे. ही पालखी, तुझा व माझा देह, नोकरवर्ग, या सर्व गोष्टी फक्त पंचमहाभूतांची झालेली जुळणी आहे. यांना चालवणारा तर कुणी वेगळाच आहे.”
एका सामान्य भोयाचे असे उत्तर ऐकल्यावर राजा चमकला. मग खाली उतरून त्याने भरताचे पाय धरले व म्हणाला
“महाराज! माझ्या अपराधांची क्षमा करा आणि सांगा की, असा अज्ञानीपणाचा बुरखा घेऊन जगात वावरणारे तुम्ही खरोखर कोण आहात? तुम्ही या प्रदेशात कोणत्या कामासाठी आला आहात? व मी तुमची कोणती सेवा करू ?”
तेव्हा ब्राह्मणदेहधारी भरत बोलू लागला –
“राजा! नीट ऐकून घे. मी असा कुणी वेगळा नाही. येणे-जाणे, काम करणे, सुखदुःख, धर्म व अधर्म हे सर्व कर्मांतून निर्माण झालेले आहे; पण परमार्थाच्या दृष्टीने हा सर्व व्यवहार मुळातच भ्रामक आहे. एकच परमात्मा सर्वत्र कणाकणांत भरलेला असताना तू व मी, राजा व प्रजा, धनी व नोकर, माझे शरीर, माझी दौलत असे म्हणणारा तो कोण? याचा जरा विचार कर.”
भरताचा सौवीर राजाला आत्मबोध!
निर्बुद्ध भासणाऱ्या त्या भरताचे म्हणणे ऐकून राजाने त्याला पुनश्च विचारले-
“अहो महाराज! तुमचे म्हणणे मला पटले. खरोखर मी आत्मज्ञान प्राप्त व्हावे यासाठी महर्षी कपिलमुनी यांना शरण जावे म्हणून निघालो होतो पण तुमची वचने व तुमचे सांगणे ऐकल्यावर आता माझी खातरी पटली आणि माझी मनोकामना तुम्हीच पुरी करून शकाल अशा विश्वासाने व आशेने मी इथेच थांबतो. आपणच मला सत्य मार्ग दाखवा.”
त्यावर भरताने राजाला प्रश्न विचारला
हे राजा! प्रथम मला असे सांग की, तुला श्रेय किंवा परमार्थ यांपैकी काय प्राप्त करावयाची इच्छा आहे? कारण की, श्रेय हे नाशीवंत आहे. पण परमार्थ मात्र चिरंतन आहे. असे पाहा की, लोक देवांची आराधना करतात. यज्ञयाग करतात, योगादिक साधने करतात व त्याचे फळ म्हणून ते धनदौलत, संपत्ती, राज्य, पुत्रपौत्र, शृंगारसुख, स्वर्गप्राप्ती या गोष्टी प्राप्त करून घेतात. हे श्रेय आहे.
मात्र फळाची अपेक्षाच न बाळगणे हेच परमोच्च श्रेय आहे म्हणून प्रकृतीच्याही पलीकडे असणारा जो परमात्मा त्याचे ध्यान करीत जावे. परमात्म्याशी समरस होणे हे अविनाशी श्रेय आहे. इतर श्रेये कितीतरी आहेत पण तो परमार्थ मुळीच नव्हे.
आता असा विचार कर की, जर धन हा परमार्थ आहे असे म्हणावे तर धर्माप्रीत्यर्थ धनाचा त्याग का केला जातो? किंवा भोगसुखासाठी धन का बेचतात? अगदी याचप्रमाणे पुत्र, राजवैभव, यज्ञयाग यांपैकी एकही गोष्ट परमार्थ नव्हे; कारण की या सर्व गोष्टी येत-जात असतात. कर्म सकाम असो नाहीतर निष्काम असो, ते एक साधन आहे – परमार्थ नव्हे! ध्यानधारणा करून जीवाचे व परमात्म्याचे ऐक्य साधावयास जावे तर तोसुद्धा परमार्थ नव्हे.
आत्मा हा एकमेव आहे. तो सर्वव्यापी असून परम पवित्र, निर्गुण,सर्वत्र सारखाच भरलेला आहे त्याला जन्म नाही की मरण नाही.झीजही नाही आणि वाढही नाही त्याला रूप असे कोणतेच नाही. त्याला नाव नाही म्हणूनच तो ‘शुद्ध जाणीव’ आहे. तो जरी सृष्टीच्या कणाकणात भरून राहिला आहे तरीही अभेद्य ,अखंड आहे.
या ज्ञानाचा साक्षात्कार होणे हाच खरा परमार्थ होय असे तू समज. खरोखर त्याच्यात भेद नाही पण जी त्याची प्रकृती (पराशक्ति) आहे. तिच्या कर्तृत्वामुळे जगात विविधता आढळून येते.
(श्री विष्णु पुराण अंश-२ क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७