इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्र सरकारने देशाच्या तिन्ही सैन्यात भरतीसाठी आणलेल्या ‘अग्निपथ योजने’ला होणारा विरोध शनिवारीही थांबला नाही. बिहारमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे, तर पंजाबच्या लुधियानामध्ये बदमाशांनी स्टेशनची तोडफोड केली. त्याच वेळी, रेल्वेने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 369 गाड्या रद्द केल्या. यामध्ये 210 मेल आणि एक्स्प्रेस आणि 159 लोकल पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे.
अधिका-यांनी सांगितले की, रेल्वेने आणखी दोन मेल/एक्स्प्रेस गाड्या अंशत: रद्द केल्या असून, दिवसभरातील एकूण गाड्यांची संख्या 371 वर पोहोचली आहे. मंगळवारी अग्निपथ योजनेची घोषणा करताना, सरकारने सांगितले होते की 17 ते 21 वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी समाविष्ट केले जाईल, तर त्यापैकी 25 टक्के नियमित सेवेसाठी कायम केले जातील.
या योजनेची घोषणा झाल्यानंतर यूपी, बिहारसह देशाच्या इतर भागात निदर्शने सुरू झाली. काही वेळातच या निदर्शनाला हिंसक वळण लागले आणि तरुणांनी अनेक गाड्या जाळल्या आणि स्टेशनची तोडफोड केली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले की, सरकार रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी रेल्वे कायदा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने काम करेल.
वैष्णव यांनी टीव्ही समिटमध्ये आंदोलकांना कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन केले. “सरकार तुमच्या सर्व समस्या ऐकून घेईल आणि त्या सोडवल्या जातील,” ते म्हणाले. सशस्त्र दलात अल्पकालीन भरतीसाठी केंद्राने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार आणि इतर राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. शुक्रवारी झालेल्या निदर्शनांदरम्यान 340 हून अधिक गाड्या प्रभावित झाल्या आणि सातहून अधिक गाड्या पेटवण्यात आल्या.