इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विलास सोपान वाडेकर यांची मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून नियुक्ती झाली आहे. ते 31 जानेवारी 2025 रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या सुभाष चंद गुप्ता यांची जागा घेणार आहेत.
सध्या वाडेकर हे एमआरव्हीसीमध्ये संचालक (तांत्रिक) या पदावर कार्यरत आहेत. ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेच्या (आयआरएसई) 1991 च्या तुकडीतील अधिकारी आहेत.
वाडेकर यांनी अमरावती विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून सर्व शाखांमध्ये अव्वल येत तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. तसेच त्यांनी स्थापत्य – संरचना अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणीतील विशेष गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
त्यांना भारतीय रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये तीन दशके काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी प्रकल्प नियोजन, अंमलबजावणी, संचालन आणि प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
2019मध्ये वाडेकर यांची भारत सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती झाली. याद्वारे त्यांचे तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्वक्षमता अधोरेखित झाली. त्यांनी रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नेतृत्व केले आहे. यात स्थापत्य, विद्युत आणि सांकेतिक व दूरसंचार कार्ये समाविष्ट आहेत.
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रकल्पांमध्ये त्यांचा 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नेतृत्वामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे जोडणीचे आधुनिकीकरण होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा मिळतील, अशी अपेक्षा आहे.
त्यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वाचे प्रकल्प:
-ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका: मुंबई उपनगरीय जोडणीमधील एक महत्त्वाचा प्रकल्प.
-उधना-जळगाव दुहेरीकरण आणि विद्युतीकरण: रेल्वे जोडणी व क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण.
-एमयूटीपी-III: विरार-डहाणू चौपदरीकरण व बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका प्रकल्पांसाठी नियोजन, आरेखन व मान्यता मिळवणे, तसेच वनविभागाची मंजुरी मिळवणे.
-अनधिकृत प्रवेश नियंत्रण कार्य: एमयूटीपी – 2ए अंतर्गत 12 उपनगरीय स्थानकांवर संकल्पना राबविली. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ झाली.
-तुर्भे-नेरुळ ट्रान्स हार्बर लाईन: ठाणे आणि पनवेलला थेट जोडणारी.
-वाडेकर यांचे अनुभव आणि कौशल्य मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासाला नवी दिशा देतील, अशी अपेक्षा आहे