नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि मानवी मेळावा असलेल्या महाकुंभ 2025 ची दृश्ये केवळ जमिनीवरुनच नव्हे तर अवकाशातून देखील टिपण्यात येत आहेत. रविवारी रात्री, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (आयएसएस) महाकुंभाच्या विस्मयचकित करणाऱ्या प्रतिमा टिपण्यात आल्या. या छायाचित्रांतून महाकुंभामध्ये दिव्यांच्या रोषणाईने उजळलेल्या गंगा नदीच्या किनाऱ्यांवर जगातील सर्वात भव्य मानवी मेळाव्याचे दर्शन घडवणारे मंत्रमुग्ध करून टाकणारे दृश्य दिसते. आयएसएस मधून टिपलेली दृश्ये अंतराळवीर डॉन पेटीट यांनी ‘एक्स’ या समाज माध्यम मंचावर सामायिक केली आहेत.
महाकुंभमेळ्यातील रोषणाईची भव्यता आणि भाविकांची प्रचंड दाटी यामुळे गंगा नदीच्या किनाऱ्यांचे एका अनोख्या दृश्यात रुपांतर झालेले या प्रतिमांमधून पाहायला मिळते. अंतराळातून टिपलेली ही छायाचित्रे पृथ्वीवरील या धार्मिक सोहोळ्याची भव्यता अधोरेखित करतात.
महाकुंभ हे जगातील सर्वात मोठे धार्मिक आयोजन असून अध्यात्मिक शांती प्राप्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येथे गंगा नदीमध्ये पवित्र स्नान करतात. आतापर्यंत 13 कोटींहून अधिक भाविकांनी येथील संगमावर स्नान करून परमानंद देणारा हा धार्मिक क्षण अनुभवला आहे. येथील छायाचित्रांनी संपूर्ण जगाला चकित करून टाकले आहे. अवकाशातून काढलेल्या छायाचित्रांनी निश्चितच साऱ्या जगातील लोकांचे लक्ष महाकुंभाकडे वेधून घेतले आहे. ही छायाचित्रे सामायिक करताना डॉन पेटीट यांनी असे म्हटले आहे की 2025 च्या महाकुंभ मेळ्याची ही अतुलनीय दृश्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून (आयएसएस) टिपण्यात आली आहेत. गंगा नदीच्या तीरांवर जगातील सर्वात भव्य मानवी मेळावा तेजाने लखलखतो आहे.
डोनाल्ड रॉय पेटीट
अमेरिकी अंतराळवीर आणि रसायनशास्त्र अभियंता असलेले डोनाल्ड रॉय पेटीट अवकाशातील छायाचित्रण आणि अभिनव संशोधनविषयक कार्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. पेटीट हे अवकाशात तयार करण्यात आलेल्या आणि पेटंट घेण्यात आलेल्या पहिल्या वस्तुचे, म्हणजेच ‘झिरो-जी कप’ चे संशोधक आहेत. वयाच्या 69 व्या वर्षी कार्यरत असलेले पेटीट नासासंस्थेचे सर्वात ज्येष्ठ सक्रीय संशोधक आहेत.