नाशिक – ४ व ५ डिसेंबर ला आयोजित, संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य संमेलन केटीएचएम कॉलेज प्रांगणात होत असून या साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे लाडके गायक आदर्श शिंदे यांची हजेरी लागणार आहे. तसेच ज्येष्ठ गायिका सुषमा देवी, गायक प्रतापसिंग बोदडे, प्रकाश पाटणकर, दिनकर शिंदे, समर्थक शिंदे, रंगराज ढेंगळे, विजयराज निकम, चेतन लोखंडे, जितू देवरे, रोहित उन्हवणे, रवी बराते, संजय उन्हवणे असे अनेक नामवंत गायक या संमेलनात उपस्थिती राहून आपले गीत गायन प्रदर्शित करणार आहे.
साहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला मशाल रॅली
नाशिकरोड – नाशिक शहरात होऊ घातलेल्या संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला थोर साहित्यिकांना अभिवादन करून मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विहितगाव येथील थोर साहित्यिक व विद्रोही साहित्य संमेलनाचे पाहिले अध्यक्ष बाबुराव बागुल यांच्या घरी जाऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्रोही साहित्य संमेलनाच्या राज्य अध्यक्ष प्रतिमा परदेशी, संमेलनाचे मुख्य विश्वस्त गणेश उन्हवणे यांच्या हस्ते बाबुराव बागुल यांच्या प्रतिमेचे पूजन करून मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्याच्या घराजवळील मातीचा कलश घेण्यात आला. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शा लागलेल्या विहितगाव येथील बुद्धविहार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उनवणे यांच्या हस्ते करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये मोटरसायकल, रिक्षा, मोठी वाहने सहभागी झाले होते. रॅली देवळालीगाव, सत्कार चौक, बिटको चौक मार्गे दत्त मंदिर चौक, अंध शाळा, नेहरूनगर,उपनगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, बोधले नगर मार्गे द्वारका चौक व तेथून वडाळा गाव राजवाडा येथील थोर साहित्यिक कवी वामनदादा कर्डक यांच्या निवासस्थानी जाऊन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नाशिकचे वैभव असलेल्या वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नाशिक शहरातील सर्व प्रमुख शक्ती व ऊर्जा स्थळे असलेल्या पुतळ्याचे पूजन करून केटीएचएम कॉलेजच्या प्रांगणातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन साहित्यिक बागुल यांच्या घराजवळील आणलेल्या मातीचा कलश संमेलन स्थळी आणून रॅलीचा समारोप करण्यात आला. मातीचा कलश आणि मशाल ही संमेलनस्थळी असलेल्या संमेलनाचे विश्वस्त मनीष बस्ते यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक साराभाई वाळुंजकर, डॉ अनिल सोनवणे, प्रकाश बागुल, बाळासाहेब जाधव, मुरलीधर घोरपडे, हरीभाऊ जाधव, राज निकाळे, विश्वनाथ भालेराव,रवी पगारे,दीपक बनसोड, प्रभाकर धात्रक, राजू देसले, चंद्रकांत भालेराव, विटी जाधव, अशोक बागुल, नितीन पगारे, निलेश उन्हवणे, प्रल्हाद मिस्त्री, प्रशांत कर्डक राजू काहार, सोनू चव्हाण, खंडू धोत्रे, शकील शेख, संतोष मनोहर आदींसह नागरिक, साहित्यिक, रसिक रॅलीत सहभागी झाले होते.