मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही श्री.देशपांडे यांनी दिली.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 49.28 टक्के मतदान
नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले असून 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी दिली.
विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 23 हजार 412 मतदारापैंकी 11 हजार 822 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 50.50 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 35 हजार 58 मतदारापैंकी 18 हजार 33 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 18 हजार 918 मतदारापैंकी 9 हजार 385 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 49.61 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.
Vidhan Parishad Graduate Teachers Election Voting