मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणुका आणि जागावाटप यावरून युतीत असलेल्या पक्षांमध्ये नेहमीच भांडं वाजत असतं. एरव्ही कितीही गळ्यात गळे घालून राहिले तरी जागावाटपाचा विषय आला की खटके उडालेच समजा. सध्या विधानपरिषद व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गट व भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे.
विधानपरिषदेसाठी शिंदे गटाला दोन तर भाजपला तीन जागांची उमेदवारी मिळेल, असे कॉमन बैठकीत ठरले होते. शिंदे गटाला कोकण आणि नाशिक अश्या दोन जागांवर आपला उमेदवार उभा करायचा होता. पण भाजपकडून उमेदवारी जाहीर करताना फक्त कोकणसाठीच शिंदे गटाच्या नेत्याचे नाव आले, नाशिकमधून मात्र भाजपकडे उमेदवारी गेली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सर्वच नेते नाराज आहे. अलीकडेच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्री दादा भुसे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर उमेदवार कसे जाहीर केले, असा थेट सवाल केला. यासंदर्भात काही मंत्री फडणवीस यांना भेटायलाही गेले. तेव्हा त्यांनी परस्पर घोषणा झालेली नाही, घोषणा करताना उदय सामंत सोबत होते, असे स्पष्ट केले. पण तेवढं ऐकून नाराजी दूर झालेली नाही, असे कळते.
नाशिकमधून भाजपचा उमेदवार
शिंदे गटाला कोकणातील जागा देऊन नाशिकमधील जागा भाजपने आपल्याकडे ठेवल्याचा आरोप होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील तीन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले. त्यातील कोकणातील उमेदवारी शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना, पश्चिम विदर्भासाठी माजी मंत्री रणजित पाटील यांना तर मराठवाड्यासाठी किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. कोकण शिक्षक मतदारसंघातून शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोरनारे यांचे नाव चर्चेत होते. पण ऐनवेळी शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे नाव जाहीर झाले.
मुख्यमंत्रीही भाजपवर नाराज
मुंबई पोलीस दलातील देवेन भारती यांच्यासाठी करण्यात आलेल्या विशेष सोयीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपवर नाराज आहेत. शिंदे गटाला किंवा खुद्द मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू झाली आहे. देवेन भारती यांच्यासाठी अलीकडेच मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्त म्हणून नवे पद निर्माण करण्यात आले आहे.
Vidhan Parishad Election Shinde Group BJP Dispute Politics
MLC CM Eknath Shinde Clashes