मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका येत्या ३० जानेवारीला होत आहेत. या निवडणुकीत खरं तर इच्छुकांमध्ये आणि अपक्षांमध्ये थेट लढत होताना दिसत आहे. पण, त्यामुळेच या निवडणुकीत प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिक्षण क्षेत्रातील व शिक्षकांच्या समस्यांभवती फिरणारी यंदाची निवडणुक प्रतिष्ठेभवती फिरताना दिसत आहे. नाशिक आणि नागपूरमध्ये महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली. नाशिकला काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला होता. ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. पण तांबे यांनी स्वतः फॉर्म दाखल न करता मुलाला म्हणजेच सत्यजित तांबे यांना अपक्ष उभे केले. पण तोंडघशी पाडल्यामुळे काँग्रेसने सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला. अश्यात भाजप वेगळीच खेळी खेळत आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या शुभांगी पाटील यांना पक्षानेच तिकीट दिले नाही. एवढच नाही तर भाजपने आपला उमेदवारच उभा केला नाही. त्यामुळे भाजपची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले गेले. त्यामुळे नाराज झालेल्या शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि त्यांनी ठाकरे गटाला आश्रय मागितला. अर्थात उद्धव यांनी तसे कुठलेच आश्वासन दिले नसल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
नाशिकच्या अटीवर नागपूरचा निर्णय
नागपूरमध्ये महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. पण राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला. आणि काँग्रेस समर्थित संघटनेचे उमेदवारही रिंगणात आले. त्यामुळे आता नाशिकमध्ये आम्ही सांगू त्या अपक्ष उमेदवाराला समर्थन दिले तर नागपूरची जागा काँग्रेससाठी सोडू, अशी भूमिका शिवसेनेने शेवटच्या क्षणाला घेतली.
‘समन्वय ठेवण्याची जबाबदारी सर्वांची’
महाविकास आघाडीत सुरू असलेल्या गोंधळावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून समन्वय ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येकवेळी शिवसेना माघार घेणार नाही. नाशिकमध्ये जे काही झाले, त्याला काँग्रेसच कारणीभूत आहे, असेही ते म्हणाले.
Vidhan Parishad Election Candidate Political Parties