इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हेच देवाला आवडेल
परमेश्वरा! शांत भावाने आम्ही मागे वळून भूतकाळात डोकावतो, गतकालीन सुखदुःखांवर नजर जाते आणि वाटते की, जे सर्व बरे आणि वाईट दोन्ही घडून गेले ती सर्व तुझी कृपाच होती. त्या सर्वांच्या परिपाकाने माझे स्व-कल्याणच होणार आहे.
स्थिर चित्ताने आम्ही भविष्यकाळात दृष्टी टाकतो तेव्हा भीती वाटत नाही. कारण, तूंच जर आमचा पाठीराखा असशील तर आम्हाला नेहमी सुरक्षितता व शांती आहेच हे मला माहीत आहे.
रानातून जातांना बैलगाडीच्या चाकाने पडलेल्या दोन घळीच्या मधील जागेवर, बैलांच्या पायाखाली तुडविले जाण्याची नेहमीच शक्यता असलेल्या अशा या धोक्याच्या जागी एक सुंदर फुलझाड चांगले दोन हात वाढलेलें मीं पाहिले. वास्तविक तसूभर गाडीचे चाक इकडे-तिकडे झाले किंवा बैलाचा पाय पडला कीं त्या फुलझाडाचा अंतच व्हायचा. तरीपण एखाद्या निर्धास्त बागेतील फुलझाडाइतकेंच जोमाने वाढलेले, रसरसलेले ते रोपटे पाहून मला गहिवरून आले. मला वाटले की, सर्व भार देवावर टाकून, भूतकाळांतील सुखदुःखांचा विसर पडून व भविष्यातील काल्पनिक संकटांचा आणि अपयशांचा विचार दूर ठेवून मी वर्तमानातच हुंदडत असावे हेंच वास्तविक देवाला आवडेल.