इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
यातच मनुष्य रमलेला असतो
देवाने हे जग निर्माण करून, त्यात काय सुधारणा हव्यात याविषयी माणसाचा अभिप्राय घेण्यासाठी ते माणसासमोर ठेवले आहे… अशा गैरसमजुतीमुळे सुधारणेचे पाठ दुसऱ्यास देण्यात मनुष्य बराचसा रमलेला दिसतो. या महान कार्यांत, स्वतःमध्ये काय सुधारणा करावयास हवी आहे या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्याला वेळ कुठे आहे?
पाय भाजतात म्हणून पादत्राणे घालण्याऐवजी पृथ्वीलाच चामड्याने मढविण्याची मूर्ख उमेद माणसाने मनात धरली आहे. चुकार लोकांची गणती करतांना अनेक वेळा माणूस स्वतःस मोजण्याचे नेमके विसरत असल्याचे दिसते. जगास फेरा घालण्याऐवजी जर मनुष्याने स्वतःभोंवती प्रदक्षिणा घालून स्वतःस सर्वांगांनी न्याहाळले, तर जगास सुधारण्याचे काम पुष्कळच आटोक्यात येईल.