विचार पुष्प – ….म्हणून देवाचे आभार महत्त्वाचे
आजचा दिवस दुःखाचा, कष्टाचा, अपमानाचाच गेला असला, कितीतरी वेळ आपण काळजीने पोळलो असलो, आंतरजीवनामधील गोंधळ व विसंवाद यांनी गांजलो असलो, तरीही दिवसाअखेरीस मी देवास नम्रतापूर्वक प्रार्थना करीन — “तुझ्या कृपाछत्राखाली मी राहात आहे. त्याबद्दल मी तुझे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो आणि करीत राहीन.”
एखाद्या संकटापासून वाचविले, एखादी अडचण दूर झाली, अमुक रोगाचें निर्मूलन झालें, एखादी काळजी नाहींशी केली यासाठी देवाचे आभार मानणे मला पसंत नाही. माझ्या अखिल जीवनांत जे जे आहे व नाही त्या दोहोंसाठी परमेश्वराचे आभार मानणे मला आवडते. कारण सुख-दुःख, आरोग्य-अनारोग्य, यश व निराशा, गुण-दुर्गुण, जीवन-मरण हे सर्व त्यानेच दिलेलें नाही का? त्याचीच ही कृपा नव्हे का? त्यायोगेच आपण जागृत राहतो, आपली प्रगति होते व ज्ञानाचा लाभही त्यामुळे होतो.