इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
तेव्हा या अधिवासाची जाणीव होईल
स्वत:ला समजून घेतल्याने आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यामुळे माणूस “परम शोध” लावू शकतो. जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ‘ईश्वरा’च्या या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या समग्र प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील.
एखाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून, त्यानुसार मार्गक्रमण केले आणि त्या मध्यवर्ती विचाराला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे कार्य आपल्यामध्ये करू देण्याची मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो. तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल.
आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जात आहेत, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी आणि आपला आडमुठा अहंकार कोसळून पडत आहे असे आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंध यांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व प्रवाहित होत आहे असे आपल्याला जाणवेल.