इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
सुखप्राप्तीचा
अतिशय सोपा, सरळ व खात्रीचा मार्ग
नेहमी नेहमी भविष्य काळात का बरे आपण डोकावून बघत असतो? वास्तविक भविष्य काळावर आपला अधिकार नाही, ते आपले क्षेत्र नाही. त्यावर स्वामित्व आहे परमेश्वराचे. तेव्हा अकारण त्यात डोकावून न्याहाळणे हे खासच अप्रशस्त आहे. समजा तसे पाहून तुम्हाला काही दिसले, तरी त्यात फिरवाफिरव करण्याचा आपल्याला अधिकार नाही; किंवा सामर्थ्यही आपणात नाही. आणि त्याला बरे अथवा वाईट ठरविण्यासाठी लागणारी अक्कलही आपल्याला नाही. मग हा नसता उद्योग आपल्याला सांगितला आहे कुणी?
परमेश्वराची इच्छा काय आहे हे कळताच ती मूर्त स्वरूपात आणण्यासाठी, क्षणाचाही विलंब न लावता त्या उद्योगास लागणे, दर क्षणी, पावलोपावली त्याचें मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करणे, स्वतःचे, कुटुंबाचे, मित्र-परिवाराचे कल्याण, बरेवाईट सर्व आनंदी वृत्तीनें त्याच्या हाती सोपविणे हा तुमच्या पूर्णत्वाचा व ईशप्राप्तीचा खरा मार्ग आहे. हे आपले कर्तव्य तर आहेच, पण हा सुखप्राप्तीचाही अतिशय सोपा, सरळ व खात्रीचा मार्ग आहे.