इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…म्हणून जीवनात कठीण प्रसंग येतात
निसर्गाच्या मर्यादा घालून परमेश्वराने एका वर्तुळात आपल्या जीवनास कोंडले आहे व त्यामुळेच काही कठीण प्रसंग येतात. तरीपण हे एकादृष्टीने बरेच आहे. खरे पाहिले तर, हे कोंडणे नसून संरक्षिणे आहे. कारण त्यायोगे काय होतें ? मन व इच्छाशक्ति प्रबळ असणारांनाही काही काही गोष्टींकडे जी अनिवार्य ओढ वाटून त्यायोगे त्यांचा अधःपात होण्याची एक शक्यता असते, ती तरी या नैसर्गिक मर्यादांमुळे दूर होते. त्या मर्यादित क्षेत्राचे पुरेसे ज्ञान करून घेण्याकडे तरी मनुष्याची दृष्टि वळते. ते ज्ञान झाल्यावर आपले ध्येय, हाती असलेला वेळ व आपला मार्ग यांची निश्चित अशी कल्पना आल्यामुळे एकंदरच जीवनात एक प्रकारची सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत होते.
परमेश्वराची आपणांकडून काय अपेक्षा आहे, त्याचे आदेश काय आहेत, त्यानुसार वर्तन करण्यास किती दक्षतेची, प्रयत्नांची आणि सामर्थ्याची जरुरी आहे हेही आपणांस समजते — मग आपल्या कार्याचे क्षेत्र मर्यादित वा विशाल असो कार्याचा परिणाम क्षणिक वा चिरकालिक होणारा असो – कोणत्याही प्रसंग कुरकुर न करता परमेश्वराने आपणास भलत्याच काम लावले आहे व कुठल्यातरीच ठिकाणी ठेवले आहे असे मनात न आणता हातचे काम अनंत कालावर दृष्टि ठेवून व परमेश्वराच्या सर्वज्ञतेवर भरंवसा ठेवून निश्चितपणें करीत रहाणें हेंच आपलें काम.