इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
कितीतरी गोष्टी क्षुल्लक असतात
मनाला वैताग आणणाऱ्या, त्याचा तोल घालविणाऱ्या कितीतरी गोष्टी वास्तविक क्षुल्लक असतात. कोणी टाकून बोलते असे उगीच वाटून हुरहुर लागते. कोणी लक्ष देत नाही असे वाटून अस्वस्थता येते. अशा स्थितीत ‘सदा आनंदी कसे राहता येणार?’ प्रश्न बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, तुमच्या सभोवतालची परिस्थिति ही दीर्घ काळाच्या कारणपरंपरेचा परिपाक आहे. तिच्यात तुम्ही म्हणाल तसा व तेव्हा बदल होण्याचा संभव नाही. आणि बदल करण्याचे सामर्थ्यही तुमच्यात नाही. बदल सावकाशच होणार. तोवर सर्वांस धैर्याने तोंड देत राहणे अटळ आहे. कधी जय, तर कधी पराजय ! काळजी व असंतोष यामुळे तुम्हास काय मिळणार? हा न्याय सर्वांनाच लागू आहे. इतरांविषयीं मत्सर कशाला ? धैर्याने तोंड देणे, न कुरकुरणे हाच एकमेव मार्ग आहे.