इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
ज्यावेळी संकट तुमच्या समोर येते
भयानक व उद्वेगजनक चेहऱ्याचा बुरखा घेऊन ज्यावेळी संकट तुमच्या समोर येते त्यावेळीं निश्चित समजा की, तुम्ही त्याचे स्वागत करून त्याला झेलू शकाल तर त्याच्याकडून तुम्हांला तितिक्षा, धीरवृत्ती, आत्मसंयम, चातुर्य, सहानुभूतीपूर्णता व श्रद्धा या सद्गुणरत्नांची अमोलिक देणगी मिळाल्याशिवाय कधी रहाणार नाही. अन्यथा भ्याडपणा, दौर्बल्य, दीनता व निराशा यांचे धनी होणे तुम्हास भाग पडेल. म्हणून लक्षांत ठेवा व संकट आले, अडचण आली आणि दिसले की, यामधून सुटकेचा मार्ग नाहीं, तर ताठ उभे राहून मर्दाप्रमाणें व खऱ्या माणसाप्रमाणे त्याला तोंड द्या.
दुसऱ्या कोणावर त्याचा भार पडणार नाही, एवढेच नव्हे, तर दुसऱ्या कोणाच्या ध्यानी सुद्धा येणार नाहीं, दृष्टीसही पडणार नाही अशा पद्धतीने त्या संकटास खांद्यावर वागवून पार व्हा. आतून तुम्ही चिंतातुर व दुःखी असला, तरी तुमच्याकडून दुसऱ्याकडे सतत आनंदाचेच पाझर पाझरत जाऊ द्या. तुमची उपस्थिती दुसऱ्यांना शांती व पुष्टि देणारी होवो.