इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
ही गोष्टच सर्वांत अधिक महत्त्वाची
आपण कोणीही असू… अधिकारी वा मजूर, विद्वान् वा अक्षरशत्रू अडाणी, विवाहित वा एकटे, गजबजल्या कुटुंबात वा अरण्यात — आपण कोठेही किंवा कोणीही असू, आपणासमोर नित्याचा दिनक्रम असतोच. आपल्यावर अवलंबून असणाऱ्याकडे लक्ष द्यायचे असते. कांही कौटुंबिक वा सामाजिक कर्तव्य पार पाडावयाची असतात.
कोणा प्रेमळ माणसाच्या शब्दाकरिता कांही विशेष गोष्टी करावयाच्या असतात. गरजवंताला मदत करावयाची असते. कांही उद्योगधंद्याची कामे उरकायची असतात. या सर्व गोष्टी करायच्या तर असतातच आणि आपापल्या क्षमतेप्रमाणें जो तो त्या करत असतोच. पण प्रत्येकात फरक हा असतोच आणि तोच महत्त्वाचा असतो. या सर्व गोष्टी करताना त्या माणसाची भूमिका कोणती असते हे पाहिले पाहिजे. मनुष्य काम कोणकोणते करतो यापेक्षा तो ते काम कसे करतो ही गोष्टच सर्वांत अधिक महत्त्वाची असते.