इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
ही आंतरिक इच्छा आहे
झोपेतून उठताच देवाचे स्मरण करा आणि त्याच्या चरणी आपले मन, शरीर अर्पण करण्याच्या भावनेचे बाह्य प्रतीक म्हणून, तसे स्मरण व उच्चार करीत, साष्टांग दंडवत घाला. नंतर उठून बसा आणि म्हणा की, “माझे आजचे सर्व विचार, कर्मामागील सर्व हेतू आणि मनांत उत्पन्न होणाऱ्या वासना देवाच्या इच्छेसच अनुसरून होवोत.”
आपल्या हातून साधारणपणें कोणत्या प्रकारच्या चुका होतात ते ध्यानात आणून मग अगदी लहान बालकाच्या भावनेने हृदयस्थ अशा परमेश्वराच्या समोर म्हणा : “मी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने वागतो. कधी कधी मोह पडतो. माझ्या हातून असे प्रमाद घडल्यानंतर मला लाज वाटते. तर देवा, माझ्या ठिकाणच्या भक्तिप्रेमाच्या बळावर अशा प्रसंगी मला जागृती राहून मी प्रमादरहित अशा रूपांत त्यातून बाहेर पडेन असे कर. तुझ्या कृपेने माझ्याकडून वाणी, हात, दृष्टि, मन याद्वारां कांही प्रमाद घडणार नाहींत याविषयी मी सावध राहीन. मला बल दे. सावधानता दे. काया, वाचा, मनानें मीं तुझ्याच इच्छेप्रमाणें चालावे अशी माझी आंतरिक इच्छा आहे. तुझ्या साह्याशिवाय हें कसें होणार? तरी तूं माझा पाठीराखा हो.”