इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हे नक्की तुमच्या नजरेस येईल
निर्मळ मनाचा एक गुण आहे. ते कधीही हट्ट करीत नाही, आग्रह धरीत नाही किंवा तक्रारी सांगत नाही. कोणत्याही गोष्टीबद्दल नाराज होताच, निराश होताच, हट्ट करताच आपल्या प्रगतीच्या प्रवासात आपण एक पाऊल मागे सरकल्यासारखे ते असते. संत, महात्मे व सज्जन यांच्या जीवनाचे निरीक्षण करून पहा. ते कधीसुद्धा नाराज झालेले तुम्हाला दिसणार नाहीत. त्यांच्या चर्येवर सतत संतोष व आनंद झळकतांना तुमच्या नजरेस येईल.
ईश्वरी व्यवस्थेचा अर्थ कळत नसल्यामुळेच, आहे यापेक्षां वेगळेच काहीतरी व्हावे, आपणास प्राप्त व्हावे अशी खोटी व दुबळी आशा आपण बाळगतो. खरे पाहिले तर, आशा करीत बसण्यापेक्षा, तुमच्या हातात असलेले व तुमच्यावर सोपवले गेलेले सर्वकाही तुम्ही जर केले असेल, तर फलाविषयीं देवावरच सर्वकाहीं सोंपवून स्वस्थ, शांत व निश्चित कां नाहीं रहात बरे तुम्ही ? ही आशाच आपल्या मनाची शांती बिघडविते. अनुकूलतेचा लाभ त्यामुळे आपण घेऊ शकत नाही. ही आशा सोडून देऊन निश्चिंतपणे काम करीत रहाणे हा एकच मनःशांतीचा व खऱ्या, देवी यशाचा मार्ग आहे.