नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील महाराष्ट्र भांडारच्या संस्थापिका व संचालिका, सौ. वीणा सुधाकर पिसोळकर (८२) यांचे गुरुवार, १३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता प्रदीर्घ आजाराने सावरकर नगर येथील घरी दुःखद निधन झाले. शुक्रवारी दुपारी पार्थिवावर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती निवृत्त मेजर सुधाकर पिसोळकर, पुत्र राजेश, मंगेश, स्नुषा प्राची आणि नाती आहेत.
वीणा पिसोळकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील औंध संस्थान येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. खूप लहान वयात त्यांचे मातृछत्र आणि पितृछत्र हरपले. गिरगाव, मुंबई येथे त्यांच्या बंधुंकडे त्यांचे शालेय शिक्षण झाले. मुंबई विद्यापीठातून ऑनर्स पदवी शिक्षण झाल्यावर BEST मध्ये सेवेस असताना, १९६७ ला त्यांचा विवाह लष्करी सेवेतील मेजर सुधाकर पिसोळकर (मूळ गाव जयखेड, ता. सटाणा) याचेशी झाला. विवाहानंतर त्या दोन वर्षे जम्मू काश्मीर येथे लष्करी कॅन्टोन्मेंट भागात वास्तव्यास होत्या. त्यानंतर १९७० ला त्या नाशिक येथे वास्तव्यास आल्या आणि त्यांनी महाराष्ट्र भांडार हा स्वव्यवसाय शालिमार, शिवाजी रोड येथे सुरू केला व सचोटीने नावारूपास आणला.
१९७० पासून ग्राहकांची खाद्य पदार्थांची गरज ओळखून, सातत्याने उच्च दर्जा राखून महाराष्ट्र भांडारला ग्राहकांच्या पसंतीस उतरवण्यात त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक छोटे व्यावसायिक उभे केले आणि गरजू महिलांना रोजगार मिळवून दिला. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी विविध पाक कला स्पर्धांमध्ये परिक्षणाचे काम बघितले आणि महिलांना मार्गदर्शन केले. मनमिळावू स्वभाव, मृदू संवाद, कौशल्य आणि हसतमुख मुद्रा यासाठी त्या नाशिकरांना सुपरिशित होत्या.
नाशिकमधील नाशिक जिमखाना येथील स्त्री मंडळ येथे सेवा देताना त्यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यात योगदान दिले. तसेच राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र याच्या स्थापनेत आपले पती सुधाकर पिसोळकर यांना बहुमूल्य असे सहकार्य केले.