नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या राज्यातील अग्रगण्य सामाजिक संघटनेचा दशकपूर्ती सोहळा व राज्यस्तरीय वंजारी समाज मेळावा यंदा रविवारी १ जानेवारी २०२३ रोजी वीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. राष्ट्रधर्म, अध्यात्म व समाजसेवा या ब्रीद वाक्याप्रमाणे संघटनेचे बिगरराजकीय स्वरूपाचे सामजिक काम मागील दहा वर्षापासून राज्याच्या ३६ जिल्ह्यात सुरू आहे. वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेची स्थापना सन २०१२ साली श्री क्षेत्र भगवानगड येथे करण्यात आली होती. राष्ट्रसंत भगवान बाबा संत वामनभाऊ संत आवजीनाथ महाराज व लोकनेते वसंतराव नाईक ,लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आदर्श मानून संघटनेने राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात आपल्या कार्यकारिणीचा विस्तार करून वंजारी समाजाला संघटित करण्याचे काम केले आहे. संघटनेत शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसोबत सामाजिक, वैद्यकीय उद्योग, कला, साहित्य क्षेत्रात काम करणारे समाजबांधव मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत._
गेल्या दहा वर्षात संघटनेने श्री क्षेत्र भगवानगड ,बार्शी, नवीमुंबई, औरंगाबाद, आळंदी, बीड , लातूर, जालना, पुणे, नागपूर, नंदुरबार, वर्धा , परभणी , हिंगोली, रत्नागिरी , नाशिक या शहरात समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे. मागील काही वर्षात संघटनेने समाजातील गुणवंतांचा सत्कार, नवनियुक्त अधिकारी वर्गाचे सत्कार,युवकांना रोजगार व व्यवसायासाठी मार्गदर्शन, वधू वर परिचय मेळावा, कोरोना काळात गरजुंना मदत,रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सोबतच भटके विमुक्त- ओबीसी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवणे, महाज्योतीच्या प्रश्नावर राज्यभरात निवेदन देणे अशा प्रमुख विषयावर महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. वंजारी सेवा संघ संघटनेला यावर्षी दहा वर्ष पूर्ण झाले आहेत त्या निमित्ताने दशकपूर्ती सोहळा व समाज मेळावा रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थित आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भटके विमुक्त चळवळीचे अभ्यासक तथा सदस्य निती आयोग भारत सरकार दादा इदाते, ओबीसी चळवळीचे मार्गदर्शक माजी आमदार डॉ नारायण मुंडे, माजी आमदार तोताराम कायंदे, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड, माजी उपनगराध्यक्ष डॉ दिपाताई गीते, ओबीसी राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र राख व ओबीसी राज्य समन्वयक अरुण खरमाटे यांची उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन वंजारी सेवा संघाच्या कोकण विभागीय कार्यकारिणीने केले आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंजारी सेवा संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल जाधवर, प्रदेश कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, प्रदेश महासचिव बाजी दराडे,प्रदेश उपाध्यक्ष अमोल कुटे,प्रदेश चिटणीस शिवाजी बडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष डॉ.मंजुषा दराडे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश आव्हाड यांनी केले आहे.