न्यूयॉर्क – भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम असून काही देशांमध्ये तर तिसऱ्या लाटेचा ही धोका दिसून येत आहे. अमेरिकेत मात्र कोरोना संबंधीच्या मार्गदर्शक नियमांमध्ये सवलत देण्यात येत आहे.
अमेरिकेत ज्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अँटी-कोरोना व्हायरस लस मिळाली आहे, त्यांना शाळेच्या आवारात मास्क घालण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र (सीडीसी) ने आपल्या कोरोना मार्गदर्शक सूचनांमध्ये सवलती दिल्या आहेत.
नव्या सवलतींनुसार लशींच्या दोन डोस घेतलेल्यांमध्ये तीन फूट अंतर (सोशल डिस्टन्सिंग) आवश्यक नाही. तर अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) म्हटले आहे की, सध्या कोरोनाचा तिसरा बूस्टर डोस घेण्याची गरज नाही. फायझर-बायोटेक या कंपनीने बूस्टर डोसची आवश्यकता सांगितली आहे.
अमेरिकेत कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तसेच १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी राष्ट्रीय लसीकरण मोहिमानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च सार्वजनिक आरोग्य एजन्सीने देखील म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसर्या म्हणजे बूस्टर डोसची अद्याप आवश्यकता नाही. तथापि, सीडीसीने शाळांना या सर्व विषयांवर स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.