इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील पाच राज्यातील निवडणूकांची रणधुमाळी सुरूआहे. यात आता रंग भरू लागले आहेत. विशेषतः पंजाब, उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या निवडणुकीत मोठी चुरस दिसून येत आहे. त्यातच उत्तर प्रदेश हे लोकसंख्येने आणि विस्ताराने मोठे राज्य असल्याने तेथील निवडणूकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी टक्कर देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत, मात्र उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र आणखीच स्पष्ट झाले आहे, त्यामुळे ही लढत अधिकच रंजक झाली आहे. काही प्रमुख उमेदवारांच्या पत्नीही पतींसमोर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
आमदार योगेश धामा हे बागपत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या पत्नी रेणू धामा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. आमदार योगेश धामा यांचा अर्ज वैध ठरला. तर, रेणू यांनी अर्ज मागे घेतला नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना किटली हे निवडणूक चिन्ह वाटप केले आहे. आता पती-पत्नी आमनेसामने असतील. रेणू या दोन वेळा बागपतच्या जिल्हा पंचायत अध्यक्ष राहिल्या आहेत. बरौत जागेवरून राष्ट्रीय लोक दल आणि समाजवादी पार्टी युतीचे उमेदवार अॅड जयवीर सिंग यांना त्यांची पत्नी रेणुबाला यांनी आव्हान दिले आहे. त्या अपक्ष उमेदवार आहेत. मोत्यांचा हार हे रेणू यांचे चिन्ह आहे. बागपत मतदारसंघातून बसपाचे उमेदवार अरुण कसाना आहेत. त्यांचा मुलगा विनय कसाना हे सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणात आहे. विनय कसाना यांचे निवडणूक चिन्ह दुर्बीण आहे.
पती-पत्नी आणि पुता-पुत्र यांनी एकमेकांना आव्हान दिल्याने या सर्व लढती सध्या उत्तर प्रदेशमध्ये विशेष चर्चेच्या ठरत आहेत. या लढतींमध्ये कोण विजयी होते? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.