मुंबई – विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोगसुद्धा (यूपीएससी) सल्लागारांची भरती करणार आहे. या भरतीतील वैशिष्ट्य म्हणजे एखाद्याची संचालक किंवा सचिव म्हणून नियुक्ती झाली तरी त्याच्या पदाचे नाव सल्लागार (कन्सल्टंट) असेच राहील. ज्या पदासाठी त्यांची नियुक्ती झाली, त्यांना तेच काम सोपविले जाईल. या नियुक्त्यांमध्ये वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे. ६४ वर्षांचे व्यक्तीसुद्धा अर्ज करू शकतात.
या पदांसाठी दक्षता आणि बेशिस्त वर्तनाबाबत कारवाईचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. कोरोना काळात म्हणजेच गेल्या वर्षीपासून केंद्र सरकार विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सल्लागारांची भरती करत आहे. नवी भरती करण्याऐवजी एक वर्षाची नियुक्ती करण्याची पद्धत केंद्राने अवलंबली आहे. याच धर्तीवर यूपीएससीसुद्धा निवृत्त झालेल्या कर्मचार्यांना एक वर्षाच्या करारावर नोकरी देणार आहे. उपसचिव, कनिष्ठ सचिव, खासगी सचिव, स्वीय सहाय्यक या पदांच्या नियुक्तीसाठी यूपीएससीने अर्ज मागविले आहेत. एक वर्षाच्या कार्यकालाच्या या पदांसाठी निवृत्त कर्मचारीही अर्ज करू शकणार आहेत.
नियुक्त झालेल्या कर्मचार्यांना बेसिक निवृत्तिवेतन कापून जी रक्कम उरेल त्याच हिशेबाने त्यांना वेतन देण्यात येणार आहे. महागाई तसेच घरभाडे भत्ता मिळणार नाही. प्रवास भत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे. सरकारी कामासाठी बाहेर जाण्याची गरज पडल्यास त्याचे पैसे मिळतील. घरापासून कार्यालयात येण्यासाठी संबंधितांनाच वाहनाची सोय करावी लागेल. एक महिन्यात दीड दिवसाची सुट्टी मिळेल. आवश्यक कामांसाठी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात बोलावले जाऊ शकते. सुट्टीच्या दिवशी जर एखादा कर्मचारी कार्यालयात आला असेल, तर त्याला अतिरिक्त कामाचे (ओव्हरटाइम) पैसे मिळणार नाहीत, असेही यूपीएससीने स्पष्ट केले आहे. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ड्यूटी करावी लागेल. वेळेचे पालन करावे लागेल. बायोमॅट्रिक सिस्टिमवर हजेरी लागणार आहे.
निवृत्तिनंतर पुन्हा नियुक्तीपत्र मिळणार्या कर्मचार्यांना मिळणारे वेतन प्राप्तीकराच्या कक्षेत येईल. सर्वकाही सुरळीत सुरू असले तरी कर्मचार्यांना गोपनीय नियमांचे कठोरतेने पालन करावे लागेल. मात्र एका वर्षाच्या करारावर नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्याला यूपीएससी सात दिवसांच्या नोटिशीवर सेवेतून कमी करू शकणार आहे. खासगी सचिव (पीएस) आणि स्वीय सहाय्यक (पीए) या पदांसाठीची वयोमर्यादा ६२ वर्षे ठेवण्यात आली आहे. पीएस आणि पीए या पदांना कंसल्टंट हेच नाव देण्यात आले आहे.