नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय लोक सेवा आयोगाने २ जुलै २०२३ रोजी घेतलेल्या सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. परीक्षा पार पडल्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडिया पोर्टलवर प्रश्नपत्रिकांच्या काही भागाची छायाचित्रे अपलोड करण्यात आली आहेत. तोपर्यंत परीक्षेला बसलेल्या सर्व परीक्षार्थींच्या हातात लाखो प्रश्नपत्रिका होत्या आणि आयोगाने संकेतस्थळावर प्रश्नपत्रिका अपलोडही केल्या होत्या. त्यामुळे, आयोगाच्या बाजूने अशी माहिती विश्वासार्ह किंवा कारवाई करण्यायोग्य नाही.
मात्र तरीही, आयोगाने या घटनेची नोंद घेतली आणि देशभरातील सर्व केंद्रांमधील परीक्षेच्या प्रक्रियेची आणि तपासणीची संपूर्ण छाननी केली. संशयास्पद असे काहीही आढळले नाही. तसेच, पूर्ण सावधगिरीची बाब म्हणून, काही अनुचित घडले का हे शोधण्यासाठी गुणवत्ता यादीच्या सर्व स्तरांवर परीक्षेच्या निकालाच्या डेटाचे विश्लेषण देखील केले. प्रत्येक स्तरावर पात्र आणि अपात्र उमेदवारांचे गुणवत्ता यादीतील क्रम व्यवस्थित आणि परीक्षार्थींच्या कामगिरीनुसार असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
काही केंद्रांमधून जास्त उमेदवार पात्र होत असल्याच्या संदर्भात, खुल्या स्पर्धांमध्ये हे काही वेगळे नाही असे नमूद केले आहे. समान अनुपात आधारावर कोणत्याही दोन परीक्षांची तुलना केली जाऊ शकत नाही तसेच वेगवेगळ्या वर्षांतील त्याच परीक्षेच्या निकालाची आकडेवारी देखील वेगळी असू शकते. घटना आणि डेटाच्या तपशीलवार आणि सखोल विश्लेषणाच्या आधारे, आयोगाचे असे ठाम मत आहे की सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा निराधार आहेत.