इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
अस्मानी अन उस्मानीने वाढविली चिंता..
शेतक-यासह सरकार चिंतेत
अख्खा महाराष्ट्र आज निसर्गाच्या दहशतीत आहे. कधी डोक्यावर ढग येतील. कधी धो धो बरसतील, कधी ओले पडतील, पावसाळ्यात पाऊस नाही पण उन्हाळ्यात पाऊस असाही प्रकार हल्ली पाहायला मिळत आहे, या सोबतच उन्हाळ्यात 44-47 अंशाला समोरे जावे लागेल याचा काही नेम राहिला नाही. निसर्गाच्या मर्जीवर जीव जात आहे तो मात्र शेतकऱ्यांचा. निसर्ग हा कधीच शेतकऱ्याच्या बाजूने
का उभा राहत नाही हे एक न पडलेले कोडेच आहे.
कधीही पहा पिके तोंडावर आली की ओला दुष्काळ पडतो, तर कधी पाणी नसते म्हणून पीके करपून जातात. कधी कोणता रोग येईल आणि त्या रोगाने शेतकऱ्याचे कंबरडं कसं मोडलं जाईल याचाही नेम नाही. या सगळ्या अस्मानी संकटातून तो वाचलाच तर उस्मानी संकट त्याच्या डोक्यावर नेहमीच घोंगावत असते. मालाला भाव न मिळणे. भाव न मिळाल्यामुळे मालाला फेकणे. त्यासाठी पैसे लागतात. त्या पलीकडे पोटच्या पोरासारखा जीव लावलेला हा माल आपल्याच हाताने धुर्यावर फेकण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या अश्रूंनी मानवाला त्या शेतकऱ्याची कधीच किव का येत नाही. या सगळ्या दुष्टचक्रात शेतकरी सतत अडकत चाललेला आहे.
निसर्गाचे चक्र हे नेहमीच मानवाच्या कल्याणासाठी फिरत असते असा समज होता आणि आहे. आज मात्र निसर्गाचा कोपच कोप पाहायला मिळतो. आपण निसर्गाचा – हास स्वहितासाठी जेव्हा करत असतो तेव्हा निसर्गही आपले रंग दाखवून मानवाला नेहमीच जागा करत आलेला आहे, परंतु मानव यातून काही अनुभव घेईल तरच तो मानव ना. समजंत पण उमजत नाही अशी गत दिसून येते. जे जे फुकटचे मिळते तेथे कशी गर्दी असते. मंदिरातील भंडारा असो की, महाराष्ट्र भूषण असो, या राजकारण्याचा शिधा असो सर्व ठिकाणी गर्दी, अफाट गर्दी असते. ती गर्दी चेंगराचेंगरीत गेली तरी काही हरकत नाही असाच समज सर्वांचा असतो. जे फुकट मिळते त्यावर माझाही हक्क आहे ही जाणीव किती महाग पडते, ते आपण खारघरच्या उदाहरणावरून पाहतच आहोत.
निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे अन जंगलतोड करायची. नदीकाठावर वस्ती करायची अन नदीच खावून टाकायची. हा सर्व खेळ मनुष्य स्वहितास्तवच करतोय ना. स्वतःचे समजूनच अतिक्रमण करून निसर्गाचा वास करतोय. मग निसर्ग कसा तुमचा विचार करणार. याकडे सरकार – प्रशासन मात्र हे उघड्या डोळ्यांनी पाहूनही न पाहिल्यासारखे करत आहे. पाहता पाहता हा खेळ मान्य करीत असल्यानेच धाक उरला नाही. निसर्गाचा – हास करत आहोत पण त्यांची काय किंमत आम्ही मोजत आहौत आणि मोजत राहणार हे या निमित्ताने समजून घ्यायला पाहिजे.
देशात या वर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतावर वारंवार ‘ला निनो’चा प्रभाव पडणार असून पावसाचे प्रमाण कमी होईल, अशी चर्चा आहे, ती खोटी ठरावी अशी इच्छा असतानाच खाजगी हवामान खात्याने अंदाज व्यक्त करून भारतीयांची चिंता वाढवलेली आहे. त्यांच्या मते या वर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने यंदाचा मॉन्सूनबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘स्कायमेट’कडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ९४ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मॉन्सूनबद्दलच्या या खासगी संस्थेच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ८१६.६ मिलीमीटर सरासरी पाऊस राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये कमी पावसाचा अंदाज व्यक्त झाला आहे. या तीनही राज्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्येच जास्त पाऊस पडत असतो. त्याच काळात धरणे भरत असतात. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यास हाच पाऊस उपयुक्त ठरत असतो. त्याच काळात नेमका पाऊस कमी पडण्याचा अंदाज असल्याने पिकांवर परिणाम होणारच आहे; अन्नधान्याचीही टंचाई निर्माण होऊन महागाईवाढीला तोंड द्यावे लागणार आहे.
शेतकरी वारंवार पेरणी करतो, पिके वाढवतो पण कधी अतिवृष्टी, कधी पावसाची दडी तर कधी शेतमालाचा घसरलेला दर अशा संकटांना तोंड देत पुढच्या लढाईसाठी तो जरी नेहमीच सज्ज असला तरी आता अस्मानी अन उस्मानी संकटाला कंटाळला आहे. शेती हेच त्याचे साधन आहे. हा सिजन खराब गेला तर पुढचा सिजन चांगला जाईल ही आशा त्याच्या जगण्याला पुढे नेत असते. गेली 3-4 वर्ष झाले सर्वच
सिजन निराश घेवून आल्याने तो पूर्णपणे मोडला आहे. या निराशाचे ढग जेव्हा सतत घोगांवत असतात तेव्हा तो वेगळा मार्ग निवडतो, तो मार्ग जरी स्वत:ची सुटका करणार असला तरी संपूर्ण परीवारासाठी दुखद असतो. त्यामुळे या मार्गालाच कायमचे बंद करण्यासाठी शेतकर्यांच्या सुख दुःखाचा विचार करून पॉलीसी ठरविता आली पाहीजे, तेव्हाच या अस्मानी – उस्मानीला तो़ड देवू शकेल. आतातर ‘स्कायमेट’ या संस्थेचा अंदाज शेतकर्यांवर निराशेचे ढग घेऊन परत आला आहे.
डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी (महाराष्ट्र शासन).
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत `चला जाणूया नदीला` राज्यस्तरीय समिती सदस्य,(महाराष्ट्र शासन).
मोबाईल – 9822380111
Unseasonal Rainfall Heat Stroke by Pravin Mahajan