पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अविवाहित जोडपे हॉटेल/लॉजमध्ये एकत्र राहत असल्याचे सापडल्यास पोलिसांकडून त्यांना त्रास दिला जातो. पण मुळात लग्नाशिवाय एकत्र राहणे हा काही गुन्हा नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या कोणत्याही अविवाहित जोडप्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही.
सध्या साताऱ्यातील कासपठारावर फुलांची उधळण पाहायला मिळत आहे. ही फुलं पाहण्यासाठी तिथे मोठी गर्दी होत असते. अहमदनगरहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या श्रुतिका आणि तिचा जवळचा मित्र संदिप हेदेखील फुलांची उधळण पाहण्यासाठी आले होते. दिवसभर कासपठार आणि जवळपासच्या परिसरात मनसोक्त फिरल्यानंतर परतीच्या प्रवासाला ते निघाले. परंतु, पाऊस सुरु झाल्याने त्यांनी रात्री तिथेच मुक्काम करुन सकाळी निघायचं ठरवलं. जवळच्याच्या एक लॉजमध्ये एक रूम बूक केली.
तितक्यात दार वाजवल्याचा आवाज आला. दार उघडताच समोर पोलिस दिसल्याने दोघेही घाबरले. पोलिसांनी रुममध्ये येऊन विचारपूस सुरु केली. दोघांनीही जे खरं होतं ते सर्व सांगितलं. पण, पोलिसांचा विश्वास बसला नाही. त्यामुळेच पोलिस स्टेशनला चला, असा आदेशच पोलिसांनी दिला. या परिस्थितीमुळे श्रुतिकाला रडू कोसळलं. संदिपने पोलिसांना विनंती करत आपल्या वकील मित्राला फोन केला. मित्राने पोलिसांशी कायदेशीर भाषेत समजावल्यानंतर पोलीस तिथून निघून गेले.
..तर अशा वेळी घाबरू नका
तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत / मित्रासोबत हॉटेलमध्ये राहत असाल आणि पोलिस आले तर घाबरण्याची गरज नाही. कारण अविवाहित प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. संविधानाच्या कलम २१ मधील मूलभूत अधिकारामध्ये स्वतःच्या इच्छेने कोणासोबतही राहण्याचा आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. यासाठी लग्न करणे आवश्यक नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे. पोलिसांकडून जर अशा जोडप्याला त्रास दिला जात असेल तर पोलिसांच्या कारवाईविरोधात हे जोडपे राज्यघटनेच्या कलम ३२ अन्वये थेट सर्वोच्च न्यायालय किंवा कलम २२६ अंतर्गत थेट उच्च न्यायालयात जाऊ शकतात. तसेच पीडित दाम्पत्याकडे मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्याचाही पर्याय आहे.
हॉटेल प्रशासनाही रोखू शकत नाही..
अविवाहित जोडप्याला रुम न देण्याचा हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियामध्ये कोणताही नियम नाही, त्यामुळे अविवाहित जोडप्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यास प्रतिबंध होतो. हॉटेल अविवाहित जोडप्याला दोघांनी विवाहित नसल्याच्या कारणावरुन थांबू शकत नाही. हॉटेलने असे केल्यास ते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मानले जाते.
पोलिसांकडून म्हणून होते चौकशी..
देशात वेश्याव्यवसाय हा गुन्हा मानला जातो. अशा वेश्याव्यवसायाच्या विरोधात किंवा गुन्हेगार लपल्याच्या संशयावरून पोलीस हॉटेलमध्ये छापे टाकतात. अविवाहित जोडप्याला अटक करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी पोलिस हॉटेल्सवर छापे टाकले जात नाहीत. हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे राहत असतील आणि छापेमारीच्या वेळी पोलिस त्यांच्याकडे आले तर अशा जोडप्याने घाबरण्याची गरज नाही. पोलिसांच्या मागणीनुसार, अशा जोडप्याला त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागेल, जेणेकरून दोघेही परस्पर संमतीने हॉटेलमध्ये राहत असल्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या वेश्याव्यवसायात सहभागी नसल्याचे सिद्ध होईल.
Unmarried Couple Hotel or Lodge Stay Right Act