मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला ५ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली असून, ५ ऑक्टोबरपर्यंत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर धनुष्यबाणाचा फैसला निवडणूक आयोगासमोर होईल. त्यामुळे आज दसऱ्याच्या दिवशी उद्धव यांना त्यांचे म्हणणे आयोगाकडे सादर करावे लागणार आहे.
शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला असल्याने धनुष्यबाण चिन्हावरुनही शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष उभा ठाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरु आहे. घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला मागच्या सुनावणीमध्ये दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनंतर आता निवडणूक आयोगही कामाला लागले आहे. शिवसेनेला आपली बाजू मांडण्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून ५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे.
आज दसरा मेळावा असताना याचदिवशी शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगासमोर स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील निर्णय घेईल. मागच्या सुनावणीमध्ये धनुष्यबाण चिन्हापूर्वी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टासमोर केली होती. पण त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी मात्र या मागणीला विरोध केला होता. उद्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामनाही रंगणार आहे. बीकेसीवर शिंदे गटाचा तर शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी एकीकडे सुरु आहे. अशातच दुसरीकडे आता शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्ह वाचवण्यासाठीही दसऱ्याच्या दिवशीच कस लागणार आहे.
Uddhav Thackeray Shivsena Symbol Election Commission