इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
पर्यावरण रक्षण : युनोच्या नजरेतून!
पर्यावरणाबाबत अलीकडे सारे जग सजग झाले आहे. जगभरातील १९३ देशांचा सहभाग असलेली युनायटेड नेशन्सची उच्चस्तरीय समिती तर याबाबत कायम विचारप्रक्रियेत असते. कार्यप्रवण राहण्याची त्या समितीची पद्धतही बरीच बोलकी आहे. युनोच्या या एन्व्हायर्नमेंट असेम्ब्लीची दर दोन वर्षांनी एक परिषद नैरोबी येथे भरते. आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे आणि जगात राबविण्यासाठीची यासंदर्भातील धोरणे, कार्यक्रम, उपक्रम याबाबत या परिषदेत सातत्याने विचार होत असतो. कालपर्यंत झालेल्या पर्यावरणाच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त करत असतानाच २०३० चे उद्दीष्ट समोर ठेवून करावयाच्या उपाययोजनांबाबतचा आग्रह हे या असेम्ब्लीचे एव्हाना मुख्य कार्य झाले आहे.
स्वच्छ, आरोग्यदायी आणि शाश्वत विकासासाठी पूरक अशा पर्यावरण निर्माणासाठी आगामी काळातील सर्वच देशांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. स्वच्छ, सुंदर पर्यावरण हा प्रत्येक मानवाचा मूलभूत अधिकार असला पाहिजे ही बाब मान्य करत शाश्वत विकासाची दिशा निश्चित करण्यावर युनोच्या पदाधिकाऱ्यांनी आता भर दिला आहे. त्यामुळेच २०३०च्या पुढे जात २०५० सालापर्यंतच्या योजना व नियोजन युनोने स्वतःसाठी आणि जगासाठीही निश्चित केले आहे.
विद्यमान पर्यावरणीय स्थितीचा अभ्यास, संशोधन, निसर्गाचे संवर्धन, वर्धन आणि पर्यावरणाच्या निरंतर शाश्वत उपयोगितेसाठी जगातील विविध देशांनी आपसातील समन्वयासोबतच स्वतःसाठी काही उद्दिष्टे निर्धारीत करण्याची गरज आहे. तरच विद्यमान आणि भविष्यातील मानवी पिढ्या त्याचा उपभोग घेऊ शकतील. अन्यथा ज्या रीतीने आणि वेगाने सध्या पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे, त्यातून वेगळीच विपरीत आणि घातक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. जगात सर्वदूर गरिबीचे वाढते प्रमाण, नैसर्गिक साधन, संसाधनांच्या शोषणाचे वाढलेले प्रमाण, या बाबी लक्षात घेता, त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंधासाठीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी महत्वाची ठरते.
तसे झाले तरच आपल्याला सद्यस्थितीतील जैवविविधतेचे नुकसान टाळता येईल. क्लायमेट चेंजवर उपाय योजता येतील. जमिनीच्या घसरणाऱ्या दर्जाबाबत काही करता येईल. मातीच्या रेतीतील रुपांतरणाची प्रक्रिया थांबवता येईल. कदाचित त्यातूनच प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येईल. टाकाऊ रासायनिक आणि जैविक घटकांच्या व्यवस्थापनाचे मार्गही त्यातून खुले होतील. म्हणूनच असेल कदाचित, पण युनोच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यावरण रक्षण, संवर्धनासाठी जनजागृतीसोबतच स्थानिक पातळीवरील निर्बंध आणि कठोर नियमावलीवर भर देत गव्हर्नन्सचाही ढाचा-आराखडा तयार केला आहे.
शाश्वत विकासासाठीच्या धडपडीसोबतच समन्वयातून पर्यावरणपूरक अशा मानवी वर्तनासाठीचा आग्रह देखील यानिमित्ताने अधोरेखित झाला आहे. म्हणूनच रिओ येथील परिषदेत यासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या घोषणापत्रावर पुन्हा पुन्हा ठाम विश्वास व्यक्त होत राहिला आहे. पर्यावरण व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या व्यक्तीगत व संस्थात्मक कार्यावर सातत्याने भर दिला गेला. यासाठी युनोच्या सदस्य राष्ट्रांसाठी एक सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यासाठी शाश्वत विकासाच्या संकल्पनेला आर्थिक, सामाजिक सोबतच पर्यावरण विकासाचे आयामही जोडण्यात आले आहेत.
या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अशा समर्पित भावनेने बजावलेल्या कर्तव्याची जोडही त्याला लाभते आहे. २०३०पर्यंत पर्यावरण रक्षण व संवर्धनासंदर्भात एक निर्धारीत पातळी गाठण्याचे उद्दीष्ट युनोने स्वतःसाठी समोर ठेवले आहे. त्यासाठी अंमलात येत असलेल्या उपायांच्या पद्धतीत काळानुसार बदल होत असले तरी, जग पुन्हा हिरवाईच्या दिशेने नेण्याच्या ध्येयात मात्र कधीच, कुठलाच बदल झालेला नाही!
डॉ. प्रवीण महाजन,
जल अभ्यासक
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी (महाराष्ट्र शासन).
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत `चला जाणूया नदीला` राज्यस्तरीय समिती सदस्य, (महाराष्ट्र शासन).
मोबाईल – 9822380111
United nations environment program by pravin mahajan