इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर यांचे एक वक्तव्य सध्या देशभरात चर्चिले जात आहे. आपल्या मुली आणि बहिणींचे लग्न मद्यपींसोबत करू नये, मद्यपी अधिकाऱ्यापेक्षा निर्व्यसनी रिक्षावाला किंवा मजूर चांगला, असं वक्तव्य किशोर यांनी केले आहे. किशोर हे उत्तरप्रदेशमध्ये लंबुआ विधानसभा मतदारसंघात व्यसनमुक्ती विषयावरील एका कार्यक्रमात बोलत होते.
कौशल किशोर म्हणाले की, दारु पिणाऱ्यांचे आयुष्य खूपच कमी असते, माझा मुलगा दारुच्या आहारी गेला होता. मी खासदार आणि माझी पत्नी आमदार असताना आमच्या मुलाचे प्राण वाचवू शकलो नाही. तर सर्वसामान्य जनता काय करू शकणार आहे. कौशल किशोर यांनी आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या दुःख व्यक्त करत सांगितले की, माझा मुलगा आकाश किशोर त्याच्या मित्रांसोबत नेहमी दारु प्यायचा. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. सहा महिन्यांनंतर त्याचे व्यसन सुटेल असे गृहीत धरून त्याचे लग्न केले होते, मात्र, लग्नानंतर त्याने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली आणि अखेरीस त्याचा मृत्यू झाला. आकाशचे निधन झाले तेव्हा त्याचा मुलगा अवघ्या दोन वर्षांचा होता. त्यामुळे अमली पदार्थांमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या हानीबाबत लोकांमध्ये जितकी भीती निर्माण होईल तितकीच भीती निर्माण करावी, असे आमचे आवाहन आहे. त्याचप्रमाणे दारुची दुकानेही बंद करण्यात यावी असे ते म्हणाले.
https://twitter.com/mp_kaushal/status/1604837394481831937?s=20&t=M587LFlvcjTZxmdFow_rqA
कौशल किशोर पुढे म्हणाले की, मुलाच्या मृत्यूनंतर आमची सून विधवा झाली. आमच्यावर अशी वेळ आली. त्यामुळे आपल्या मुली आणि बहिणींना यापासून वाचवा अशी विनंती त्यांनी जनतेला केली. आता दरवर्षी सुमारे २० लाख नागरिक अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मरतात. तसेच तंबाखू, सिगारेट आणि बिडीच्या व्यसनामुळे सुमारे ८० टक्के नागरिक कर्करोगाने मरतात, असे देखील कौशल किशोर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अमली पदार्थांमुळे जगासह आपल्या देशाला पूर्णपणे काबीज केले आहे. यापूर्वी कौशल यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय नेते तथा महापुरुषांविषयी अशीच वादग्रस्त वक्तव्य केली होती.
https://twitter.com/mp_kaushal/status/1607379215741243392?s=20&t=M587LFlvcjTZxmdFow_rqA
Union Minister Kaushal Kishore Says About Son Incidence