मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या धामधुमीनंतर आता राज्यात राजकीय फटाके वाजणार आहेत. कारण, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. याअंतर्गत ते राज्याच्या विविध भागात जाहीर सभा घेणार आहेत. याच आठवड्यापासून या राजकीय फटाक्यांना प्रारंभ होणार आहे.
राज्यात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहेत. उद्धव यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला. तेथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आता उद्धव यांनी संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार विरोधात वातावरण तयार होण्याची चिन्हे आहेत. याची दखल घेत आता शिंदे-फडणवीस यांनीही एकत्रित महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. येत्या शनिवारपासूनच शिंदे-फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला नंदुरबार येथून सुरुवात होण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाने शेतीची दाणादाण उडविली आहे. अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि सत्ताधारी शिदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्यासाठी ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर ठाकरे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. तसेच, नजिकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळेही या तिन्ही नेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Uddhav Thackeray Devendra Fadanvis Eknath Shinde Maharashtra Tour
Politics