सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील एका तरुणाने जुळ्या बहिणींशी लग्न केल्याची चर्चा राज्यभरात पसरली आहे. मात्र आता हा तरूण चांगलाच अडचणीत आला आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून त्यांनी पोलिसांना पत्र पाठवले आहे. या प्रकाराची त्वरीत चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
याबाबत माहिती देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापूर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा असं त्यांनी म्हणलं आहे.
वराविरुद्ध गुन्हा दाखल
माळेवाडी – अकलूज येथे एकाच वेळी दोन वधूंशी विवाह केल्याप्रकरणी वराविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकलूज पोलिसांनी १९६०च्या कलम ४९४ नुसार द्विभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. माळेवाडी अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे शुक्रवारी अतुल आवताडे याने कांदिवली येथील रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह करून द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणून माळेवाडी-अकलूज येथीलच राहुल फुले या युवकाने अकलूज पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
म्हणून केले लग्न…
रिंकी व पिंकी या आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करतात. वडिलांच्या पश्चात त्या आईसोबत राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी दोघी व आईदेखील आजारी पडली. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे त्यांना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. दरम्यान, या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून काहींनी आम्हाला एक वधू मिळत नाही, म्हणून खंत व्यक्त केली, तर काहींनी ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे’ असेही मत मांडले होते.
Twin Sisters Married Youth Trouble Police Enquiry