इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसिरीज या भलत्याच लोकप्रिय होत आहेत. वेगळे विषय हाताळत असल्याने त्यांचा प्रेक्षकवर्ग सातत्याने वाढतानाच दिसतो आहे. हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स लोकप्रिय होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे यावर कोणतेही निर्बंध नाहीत. सेक्स, शिवीगाळ अशा गोष्टी सर्रासपणे यात दाखवल्या जातात. नेमकी हीच गोष्ट आता खटकली असून, न्यायालयाने याबाबत विशेष टिप्पणी केली आहे. सोशल मीडियावर असभ्य भाषेचा वापर वाढतो आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
ही सगळी चर्चा करण्याचे कारण म्हणजे ‘कॉलेज रोमान्स’ नावाची टीव्हीएफची वेबसिरीज वादात सापडली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ‘कॉलेज रोमान्स’ या सीरिजविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या सीरिजमध्ये वापरण्यात आलेली भाषा असभ्य तसेच आक्षेपार्ह आहे. कुटुंबियांसोबत तर ही सिरीज पाहता येत नाहीच, पण आपली आपण पाहताना देखील भाषेमुळे इअरफोन वापरावे लागले, असं निरीक्षण न्यायालयाने नमूद केलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नैतिकतेची व्याख्या वेगळी असू शकते आणि त्यासाठी न्यायालयाने पश्चिमेकडे नाही तर स्वतःच्या नियमांकडे पाहण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. कारण हे सर्व प्लॅटफॉर्म्स लहान वयातील मुलांसाठी खुले आहेत.
सोशल मीडिया तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवावे, याचे नियम करण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य कायदा तसेच मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या आव्हानाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. ‘लाइव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा म्हणाले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असभ्य भाषेचा वापर वाढतो आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या देशातील बहुसंख्य लोक असे अश्लील, असभ्य शब्द वापरत आहेत, असे म्हणता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटले आहे.
याबाबत एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या वेबसिरीजमध्ये अश्लील तसेच असभय शब्द वापरल्याचे तक्रारदाराची तक्रार होती. यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ आणि २९४, माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि ६७ अ आणि कलम २ (क), ३ आणि ४ चे उल्लंघन झाले आहे. यात महिलांना अश्लील स्वरूपात दाखवल्याचे तक्रारकर्त्याचं म्हणणं होतं. कोर्टाने यावर सुनावणी करताना वेब सीरिजविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1632769048093298688?s=20
TVF Creation College Romance Web Series Court Order