इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘सुख म्हणजे काय असतं’, ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. यातील सगळेच कलाकार, त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच भावतात. या मालिकेत सध्या मोठ्या प्रमाणावर ट्विस्ट आणि टर्न सुरू आहेत. त्यामुळे ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरते आहे. सध्या या मालिकेचं कथानक रोमांचक वळणावर आहे.
या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली गौरी ही गरोदर आहे. तिचा जीवघेणा अपघात होतो. यामुळे गौरी आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला. या दोघांचा जीव वाचावा म्हणून जयदीप प्रयत्न करतो आहे. त्याच्या या प्रयत्नांना देवीने बळ दिले आणि या दोघांचेही जीव वाचवण्यात जयदीपला यश आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात हा भाग प्रदर्शित झाला आहे.
या जीवघेण्या अपघातातून गौरी आणि तिच्या बाळाचा जीव वाचावा म्हणून जयदीप अंबाबाईला साकडे घालतो. तिचे व्रतही तो श्रद्धेने पूर्ण करतो. त्याने मनापासून घातलेली ही साद देवी अंबाबाईने ऐकली आणि गौरी तसेच बाळाचा जीवही वाचवला. संकटात सापडलेल्या भक्ताला मदत करायला देव कोणत्या ना कोणत्या रूपात येतो असं म्हणतात. यावेळी जयदीपच्या मदतीला अंबाबाई डॉक्टरच्या रूपात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी शिर्के पाटील यांच्या घरात लक्ष्मीचे आगमन झाले. गौरी आणि बाळ दोघेही सुखरूप असून आता या मालिकेत काय वळण मिळते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत या मालिकेतील गौरी – जयदीपवर अनेक संकटे आली. त्या प्रत्येक संकटातून हे दोघे सहीसलामत बाहेर आले. इथून पुढे या मालिकेत चांगला ट्रॅक येईल अशी अशा प्रेक्षकांना आहे. या मालिकेतील नवीन ट्विस्टमुळे ही मालिका टीआरपीमध्ये सातत्याने पहिल्या पाच क्रमांकामध्ये येते आहे.
TV Serial Sukh Mhanje Kay Asta New Twist
Entertainment Star Pravah