इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील हिंदी मालिका ‘मीत बदलेगी दुनिया की रीत’ च्या सेटवर अचानक आग लागली असून यात सेटवरील एक खोली खाक झाली आहे. सेटवर आग लागल्याचे कळताच चाहते चिंतीत झाले. या मालिकेतील अभिनेत्री आशी सिंगने या आगीबद्दल, तसेच आग कशी लागली याबद्दल माहिती दिली. या मालिकेत आशी सिंग आणि शगुन पांडे या मुख्य भूमिकेत आहेत. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी सेटवर मोठ्या प्रमाणात लोक आणि मालिकेतील कलाकार उपस्थित होते. आगीची माहिती मिळताच एकच गोंधळ हा सेटवर बघायला मिळाला.
आगीचे कारण
एका खासगी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सेटवरील एका खोलीच्या एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे सेटला आग लागली. ती खोली पूर्णपणे खाक झाली आहे. मात्र, तिथे ठेवलेले कॅमेरे आणि इतर उपकरणे वेळीच बाहेर काढण्यात आली. यामुळे याचे नुकसान टळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय शॉर्ट सर्किटचे मूळ कारण शोधण्यासाठी सध्या तपास सुरू आहे, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील.
अभिनेत्री म्हणाली
अभिनेत्री आशी सिंग म्हणाली की, ‘सेटवरील सर्वजण ठीक आहेत. एक छोटीशी आग लागली होती जी ती फक्त एका खोलीतच लागली होती. त्या खोलीचा एसी नीट काम करत नव्हता. सेटवरील प्रत्येकजण सुरक्षित आहेत. कारण त्या खोलीत कोणीच नव्हते. सर्वजण सेटवर होते आणि आम्ही शूटिंगही पुन्हा सुरू केले.
लोकप्रिय मालिका
मीत मालिकेबद्दल सांगायचं तर, मीत हुड्डाने चीकूला अपहरणकर्त्यांपासून कसे वाचवले हे मालिकेत दाखवण्यात आले होते. मीत आता तिच्या मुलाला अमेरिकेत जाण्यापासून रोखू शकेल का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.
काही दिवसांपूर्वी
काही दिवसांपूर्वीच ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेच्या सेटवर देखील आगीची घटना घडली होती. मात्र, गुम है किसी के प्यार में मालिकेच्या सेटवर अत्यंत मोठी आग लागली होती. सेटवरील कलाकारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.
TV Serial Meet Badlegi Shooting Set Fire