इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरचे जवळपास सगळेच कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असतात. प्रेक्षकांना आवडतील अशा विषयावरील मालिका या लोकप्रिय होतातच, पण अनेक कथाबाह्य कार्यक्रमांना देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळते. याच कार्यक्रमातील एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे नितांत प्रेम मिळाले आहे.
असं म्हणतात की, लोकांना रडवण सोपं असतं पण हसवण फार कठीण. आणि ही कठीण गोष्ट कित्येक वर्षे हास्यजत्रेतील कलाकार अगदी लीलया पार पाडत आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांची रजा घेणार असल्याची माहिती मिळते आहे. गेली अनेक वर्षे विशेषत: लॉकडाऊनच्या निराशेच्या काळात या कार्यक्रमाने लोकांचे निखळ मनोरंजन केले. त्यामुळे आता मिळणाऱ्या या माहितीने या कार्यक्रमाचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.
नवोदित कलाकारांना संधी
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालं. या संधीचा योग्य फायदा घेत अनेक कलाकार रातोरात स्टार झाले. या कार्यक्रमातील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पण लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.
कलाकारांची पोस्ट
या कार्यक्रमातील प्रियदर्शनी इंदलकर, रसिरा वेंगुर्लेकर आणि गौरव मोरे या कलाकारांनी सोशल मीडियावर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले. सेटवरचा फोटो शेअर करत प्रियदर्शनीने लिहिलं आहे,”दोन महिन्यांनंतर भेटू”. रसिका वेंगुर्लेकरने लिहिलं आहे,”शेवटच्या शेड्युलचा शेवटचा दिवस…या माझ्या अतरंगी मित्रांबरोबरचे शेवटचे काही क्षण”. तर रसिका वेंगुर्लेकर म्हणते, “काळजी करू नका… ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होत नाही. आम्ही संपूर्ण टीम छोटीशी सुट्टी घेत आहोत. लवकरच येऊ तुमच्या भेटीला”.
शेवटचा भाग
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा या आठवड्यात शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. या कार्यक्रमातील समीर चौघुले, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांचे काम नेहमीच नावाजले गेले. तर परीक्षक असलेल्या सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांनादेखील सर्वांची पसंती मिळाली.
https://twitter.com/sonymarathitv/status/1660850790645510145?s=20
‘हा’ कार्यक्रम घेणार जागा
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची जागा आता ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घेणार आहे. हा कार्यक्रम देखील प्रेक्षकांचा आवडीचा आहे. २९ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर, असा ‘कोण होणार करोडपती’चा नवा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 29 मेपासून प्रेक्षकांना ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांचे सूत्रसंचालनही प्रेक्षकांना आवडते.
https://twitter.com/sonymarathitv/status/1660527931683385346?s=20
TV Comedy Show Maharashtrachi Hasyajatra