इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडच्या काळात इतिहासाला उजाळा देणारे अनेक चित्रपट येताना दिसतात. यातील ‘काश्मीर फाईल्स’ सारखे चित्रपट चांगलेच वादात सापडतात. यावरून अनेक मतमतांतरे समोर आली. टोकाचा विरोध आणि टोकाचे समर्थनही करण्यात आले. ‘ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट तर समोर आलाच नाही. याच पठडीत आता एक नवीन चित्रपट येऊ घातला आहे. ‘गांधी – गोडसे युद्ध विचारोंका’ हा नवीन चित्रपट येऊ घातला आहे.
एखाद्या विषयावर, सामाजिक मुद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा हातखंडा आहे. ‘घायल’, ‘घातक’, ‘दामिनी’, अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करत संतोषी यांनी समाजातील मुद्दे अधोरेखित केले. आता त्यांचा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट येत आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला आहे. चिन्मय मांडलेकर यात नथुरामच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र यावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी टीका केली आहे.
गांधी वधानंतर तुरुंगातील नथुरामला भेटायला गांधी जातात असे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात त्यांना एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे. यावर नुकतंच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी यावर भाष्य केलं आहे. हत्या करणाऱ्या लोकांचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांचा चित्रपट पाहायची मला मुळीच इच्छा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार ते म्हणाले, “मला याचं अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही कारण गोडसे हा त्यांच्यासाठी नायक आहे, आणि जर ते त्याला नायकासारखं सादर करणार असतील तर त्यात कुणालाच आश्चर्य वाटायला नको. चित्रपट किती योग्य आणि अयोग्य यावर मी भाष्य करणार नाही, आणि मारेकऱ्यांचं उदात्तीकरण करणारा चित्रपट पहायचा माझा हेतूही नाही.
इतकंच नाही तर राजकुमार संतोषी यांनी त्यांच्या ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटात गांधीजींचं पात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर केलं असल्याचंही तुषार गांधी यांनी निदर्शनास आणून दिलं. तब्बल ९ वर्षांनी इतिहासातील एका महत्त्वाच्या आणि वादग्रस्त घटनेला हात घालायचं काम राजकुमार संतोषी करत आहेत. प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे. या ट्रेलरलाही लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
Tushar Gandhi Reaction on Gandhi Godse Film