त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाढदिवसाचे औचित्यसाधून छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी सहपरिवार श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला भेट दिली. सकाळी सव्वासात वाजेच्या दरम्यान त्यांचे येथे आगमन झाले. त्यांचे सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगीताराजे व पुत्र युवराज शहाजीराजे उपस्थित होते. ढोलताशांच्या गजरात त्यांचे आगमन झाले. नगरीच्या वतीने सुरेशतात्या गंगापुत्र यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर सर्व लवाजमा भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदीरात गेला. छत्रपती संभाजीराजेंनी सहपरिवार भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन गर्भगृहाच्या उंबर्यापासून भगवान त्र्यंबकेश्वराची आरती केली. पुजेचे पौरोहित्य त्यांचे सोबत आलेले राजपुरोहित अमर जुगर, संदीप दादरणे व स्थानिक पुरोहित जयदीप शिखरे यांनी केले. तुंगार ट्रस्टच्या वतीने उमेश तुंगार व मनोज तुंगार यांनी शालश्रीफळ देउन त्यांचा सत्कार केला. दर्शन आटोपल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात नगरीच्या वतीने व देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुरेशतात्या गंगापुत्र, सौ. अंजना गंगापुत्र व विश्वस्त भुषण अडसरे यांनी शाल, श्रीफळ, भगवान त्र्यंबकराजाची प्रतिमा देऊन सर्वांचा सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष स्वप्निल शेलार, माजी नगरसेवक शामराव गंगापुत्र, माजी सैनिक परशुराम पवार, किरण चौधरी, अक्षय नारळे, शेखर सावंत, नितिन शिंदे, दिपक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. मंदीराच्या प्रांगणात त्यांचे सोबत फोटो काढण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर ढोलताशांच्या आणी टाळमृदुंगाच्या गजरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शौर्य लाठीकाठी पथकाचे अध्यक्ष युवराज तथा बंटी गंगापुत्र यांचे मार्गदर्शनाखाली मुलामुलींनी उत्कृष्ठ लाठीकाठीचे खेळ सादर केले. वाढदिवसानिमित्त त्यांचे हस्ते पुरणपोळीचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व त्यांचे सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दर्शन सोहळा आटोपुन सर्व ताफा नाशिककडे रवाना झाला.