त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रावण महिन्याला उद्यापासून प्रारंभ होत आहे. सलग दोन वर्षे कोरोनामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी होती. गर्दी होईल म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती. दोन वर्षानंतर आता तिस-या वर्षी श्रावण फेरीचा आनंद घेण्यास मिळणार म्हणून भाविक पर्यटक आनंदात आहेत. यानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व त्र्यंबक नगरपरिषदे तर्फे वेगवेगळे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने मंदिराच्या नियमांचे पालन करुन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य यांनी केले आहे.
सर्व भाविकांना मोफत धर्मदर्शन वातानुकूलित मंडपातून पूर्व दरवाजाने जाऊन धर्मदर्शन मिळेल. या ठिकाणी भाविक थंडी, ऊन, पावसापासून सुरक्षित राहतील. वयस्कर भाविक यांना बसण्यासाठी रांगेतील स्टीलच्या बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनपान मातांसाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या वातानुकूलित दर्शनबारीत एकावेळेस एक हजार माणसे उभी राहुन शकतात. श्रावण महिन्यात सर्व सोमवार वगळता मंदिर पहाटे ५ वाजता उघडेल व रात्री ९ वाजता बंद होईल. तर प्रत्येक श्रावण सोमवारी फक्त महिन्यात पहाटे ४ वाजता उघडून रात्री ९ वा.बंद होईल.
स्थानिक गावक-यांना दर्शनाची व्यवस्था मंदिर उघडल्यापासून ते सकाळी ११ पर्यंत राहील व सायंकाळी ६ ते मंदिर बंद होईपर्यंत म्हणजे रात्री ९ वाजेपर्यंत उत्तर महादरवाजाने प्रवेश मिळून मंदिरातील जाळीच्या दरवाजाने आतमध्ये प्रवेश मिळेल. त्यासाठी त्यांनी आधारकार्ड व ओळखपत्र स्वतःजवळ ठेवावे. तर शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना पूर्वनियोजित लेखी प्रोटोकॉल असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे व्हीआयपी प्रवेश मिळणार नाही.
त्र्यंबक नगरपरिषदेचे असे आहे नियोजन
नगर परिषदेच्या वतीने साफसफाई व स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे. सफाई कामगार कमी पडल्यास नव्याने टेंपररी भरती केली जाईल. प्रदक्षिणा मार्गावर भाविकांना जाण्यासाठी मार्गदर्शक फलक लावण्यात येणार आहेत. गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आले तर नगर परिषदेने अतिक्रमण पथक सज्ज ठेवलेले असल्याने कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिकांनी अतिक्रमण करु नये. गावांसह प्रदक्षिणा मार्गावर १५ ठिकाणी पिण्याच्या २००० लिटर्सच्या पाण्याच्या टाक्यांची सोय करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास पाण्याचे टँकर्स मागविण्यात येतील.
वेळ प्रसंगी आपत्तीजनक घटना घडल्यास कुशावर्तावर जीवरक्षक दलाचे जवान तैनात असतील तर त्र्यंबकेश्वर मंदिरा जवळ नगरपरिषदेचे अग्नीशमन दलाची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. गावात पुरेसा विद्युत पुरवठा असावा म्हणुन महत्वाच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची शौचालयाची गैरसोय होऊ नये म्हणुन गणपतीबारी, जव्हार रस्ता बस स्थानक, प्रयागतिर्थ आदी ठिकाणी फिरते शौचालये सज्ज ठेवली आहेत. प्रत्येक सोमवारी गावात वाहने येऊ नयेत म्हणुन गावाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेडस लावण्यात येतील. वाहने तेथील परिसरात लावावीत. तर दि.१३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व वाहनांनागावात प्रवेश बंद असून वाहने प्रशासनाने ठरवुन दिलेल्या वाहनतळावर वाहने उभी करावीत. तेथून गावात येण्यास एसटी बसची सोय करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे संपुर्ण प्लॅस्टिक बंदी आहे. यावेळी चुकूनही प्लॅस्टिकचा वापर करु नये व नाहक दंड भरुन नये. मंदिराच्या दर्शन बारीत, गावात, त्र्यंबकेश्वर मंदिरा समोर, कुशावर्त तिर्थाजवळ, सर्व वाहनतळ व फेरी मार्ग आदी ठिकाणी वैद्यकीय पथके नियुक्त केली आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या तीन, त्र्यंबकेश्वर देवस्थानची एक व एक खासगी अशा पाच रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.