त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – राजधानी दिल्ली येथे आध्यात्मिक परिषदेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्र्यंबकेश्वर भेटीचे निमंत्रण केंद्रीय मंत्र्यामार्फत पत्राव्दारे दिले आहे. यामध्ये त्यांनी सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर येथे भरतो. अत्यंत प्राचीन परंपरा असलेला सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये संपन्न होत आहे. त्या अगोदर आपण येथे दर्शनासाठी आलात, तर सिंहस्थाच्या पूर्वतयारीसाठी योग्य नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी अधिक वेगाने प्रयत्न होतील, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आजादी का अमृतमहोत्सवाच्या अंतर्गत नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या आध्यात्मिक परिषदेत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त भूषण अडसरे, विश्वस्त संतोष कदम आणि नगरसेवक तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र सहभागी झाले होते.भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील आध्यात्मिक धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करत परिषद आयोजित केली होती. संपूर्ण देशातील २२ धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. वैभवशाली संस्कृतीचा ठेवा जपत असतांना चर्चा मंथन करत विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक पर्यटन विकास मंत्री जी. किशन रेड्डी होते. तसेच संसदीय व्यवहार व सांस्कृतिक मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि परराष्ट्र व्यवहार व सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी देखील सहभाग नोंदविला. यावेळेस संपूर्ण देशातून आलेल्या धार्मिक, आध्यात्मिक संस्था, मंदिर, मठ, आश्रम यांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. भाविक, भक्त, पर्यटक आणि साधक यांच्यासाठी काय करता येणे शक्य आहे ? याची चर्चा झाली. या दरम्यान त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्तांनी मंत्री महोदयांना त्र्यंबकराजाची प्रतिमा भेट दिली.